ग्रामीण मुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी लातूर जिल्हा परिषदेच्या केंद्रस्थानी शिक्षण!

By हरी मोकाशे | Published: March 21, 2023 08:22 PM2023-03-21T20:22:38+5:302023-03-21T20:23:27+5:30

३५ कोटींचे शिलकीचे अंदाजपत्रक; आरोग्य, कृषी, पशुसंवर्धनमध्ये नवीन योजना

Education at the center of Latur Zilla Parishad to increase the quality of rural children! | ग्रामीण मुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी लातूर जिल्हा परिषदेच्या केंद्रस्थानी शिक्षण!

ग्रामीण मुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी लातूर जिल्हा परिषदेच्या केंद्रस्थानी शिक्षण!

googlenewsNext

लातूर : आगामी वर्षासाठीच्या जिल्हा परिषदेच्या ३५ कोटी ३३ लाखांच्या शिलकी अंदाजपत्रकास सीईओंनी मंगळवारी मंजुरी दिली. यात आरोग्य, कृषी, पशुसंवर्धन, शिक्षणवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील मुलांची गुणवत्ता वाढावी म्हणून शिक्षणासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक अभिनव गोयल यांच्यासमोर मुख्य लेखा व वित्त अधिकारी आप्पासाहेब चाटे यांनी मंगळवारी जिल्हा परिषदेचा सन २०२३- २४ चा ३५ कोटी ३३ लाख ९९ हजार ९७६ रुपयांच्या जमेचा आणि ३० कोटी ३१ लाख ३३ हजारांच्या खर्चाचा अर्थसंकल्प सादर केला. तो प्रशासक गोयल यांनी मंजूर केला. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन दाताळ, दत्तात्रय गिरी, देवदत्त गिरी, किशोर काळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच.व्ही. वडगावे, कार्यकारी अभियंता चिटगोपकर, बाळासाहेब शेलार, जिल्हा समाजकल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी आदींची उपस्थिती होती.

या अंदाजपत्रकात प्रशासनासाठी ३ कोटी २२ लाख, शिक्षणसाठी २ कोटी ६० लाख, बांधकामसाठी ४ कोटी ३६ लाख, लघुपाबंधारेसाठी ५० लाख, स्वच्छता व सार्वजनिक आरोग्यसाठी ८३ कोटी ७६ हजार, सार्वजनिक आरोग्यसाठी ३ कोटी ५० लाख, कृषीसाठी १ कोटी ४९ लाख, पशुसंवर्धन- १ कोटी ९२ लाख, वनविभागसाठी १५ लाख, समाजकल्याण- २ कोटी ५५ लाख, दिव्यांगांच्या कल्याणसाठी २ कोटी २४ लाख, महिला व बालकल्याण- १ कोटी ७५ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच संकीर्णसाठी २ कोटी ४२ लाखांची तरतूद करण्यात आली आहे.

आगामी वर्षात नाविण्यपूर्ण योजना...
प्रशासक गोयल यांनी आगामी वर्षात काही नाविण्यपूर्ण योजना राबविण्याचा संकल्प केला आहे. प्राथमिक शाळांच्या देखभाल दुरुस्ती, गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधेसाठी निधीची विशेष तरतूद करण्यात आली आहे. तसेच ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि त्यांना शहरी मुलांप्रमाणे अत्याधुनिक सोयी- सुविधा पुरविण्यासाठी विशेष लक्ष दिले आहे.

शैक्षणिक मदतीसाठी अमेझॉन अलेक्सा...
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांत वाचन संस्कृती वाढविण्यासाठी तसेच शैक्षणिक पुस्तकांव्यतिरिक्त इतर चांगली पुस्तके वाचावित म्हणून पुस्तकांचा संच उपलब्ध केला जाणार आहे. तसेच शैक्षणिक मदतीसाठी अमेझॉन अलेक्सा हे उपकरण शाळांना पुरविण्यात येणार आहे.

सुधारित बियाणांची आयात व वाटप...
ग्रामीण भागात उत्पन्नाचे प्रमुख स्त्रोत शेती असल्याने शेतकऱ्यांना आधुनिक पध्दतीचे बियाणे, आधुनिक तंत्रज्ञानावर अधारित कृषी औजारे, संयत्रासाठी तरतूद करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक पशुवैद्यकीय दवाखान्यावर सोलार पॅनल बसविण्याचे नियोजित आहे.

स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन...
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मागासवर्गीय समाजातील मुला- मुलींसाठी अर्थसहाय्य तसेच अभ्यासिका सुरु करण्याचे नियोजित आहे. त्याचबरोबर मुलींना सायकल उपलब्ध करुन देण्यासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्य लेखा व वित्त अधिकारी आप्पासाहेब चाटे यांनी दिली.

Web Title: Education at the center of Latur Zilla Parishad to increase the quality of rural children!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.