सकस चाऱ्याअभावी पशुंच्या प्रजननावर होतोय् परिणाम : बाळासाहेब गिते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 01:04 PM2018-12-15T13:04:30+5:302018-12-15T13:05:15+5:30

सध्या मराठवाड्यात दुष्काळी स्थिती आहे़ पाण्यासोबतच चाऱ्याचीही टंचाई भेडसावू लागली आहे़

Effect of breeding animals due to fierce fertility: Balasaheb Gite | सकस चाऱ्याअभावी पशुंच्या प्रजननावर होतोय् परिणाम : बाळासाहेब गिते

सकस चाऱ्याअभावी पशुंच्या प्रजननावर होतोय् परिणाम : बाळासाहेब गिते

Next

- उन्मेष पाटील 

कळंब (जि़उस्मानाबाद) : सध्या मराठवाड्यात दुष्काळी स्थिती आहे़ पाण्यासोबतच चाऱ्याचीही टंचाई भेडसावू लागली आहे़ पशुधनास सकस आहार मिळणे जवळपास दुरापास्त झाले आहे़ अशा परिस्थितीत पशुंच्या प्रजननावर मोठा परिणाम होतो़ त्यांचे गर्भपाताचे प्रमाण वाढीस लागून, रिपीट ब्रिडींगमध्येही समस्या उद्भवतात, अशी माहिती मराठवाड्यातील दुग्धव्यवसाय अभ्यासक बाळासाहेब गिते यांनी दिली़ 

प्रश्न : दुष्काळी स्थितीचा पशुधनावर कसा परिणाम होत आहे?
गिते : यावर्षी पर्जन्यमान ५० टक्क्यांपर्यंतच सिमीत राहिल्याने शेती व्यवसायाला मोठा फटका बसला़ यास पूरक व्यवसाय म्हणून पाहिल्या जाणाऱ्या पशुपालनास त्याीूनही मोठा फटका बसताना दिसतो आहे़ डिसेंबर महिन्यात पशुधनाची चारा-पाण्यासाठी भटकंती सुरु झाली आहे़ उस्मानाबाद जिल्ह्यात सुमारे ७ लाखांवर पशुधन आहे़ यातील सर्वाधिक पशुधन हे दुधाळ आहेत़ त्यांना शक्यतो जागेवर किंवा जवळच्या परिसरातच चारा-पाण्याची सोय असणे खूप महत्वाचे आहे़ भटकंती व सकस चाऱ्याचा अभाव याचा परिणाम दूधक्षमता घटण्यात होत आहे़ यामुळे उत्पन्न घटून शेतकरी, पशुपालकांचे नुकसानच होणार आहे़

प्रश्न : पशुपालन अन् अर्थकारणाची सांगड कशी घालता?
गिते : आपल्या मराठवाड्यात अन् विशेषत: उस्मानाबाद, लातूर, बीड जिल्ह्यात जास्तीत जास्त नागरिक प्रामुख्याने शेतीवर अवलंबून आहे़ शेतीत पिकले तरच बाजारपेठेत गर्दी दिसते व त्यातून अर्थकारण प्रवाही राहते़ मात्र, मागील काही वर्षांमध्ये या भागाला सातत्याने अवर्षणाला सामोरे जावे लागत आहे़ शेती शाश्वत राहिली नसल्याने अनेक शेतकरी पशुपालनाच्या जोडधंद्याकडे वळले आहेत़ यामुळे पशुधनांची संख्या झपाट्याने वाढली़ शेतीतून मिळणारे उत्पन्न व पशुपालनातील उत्पन्न यात आता फार मोठा फरक राहिला नाही़ शेती पिकली नाही तर शेतकऱ्यांना या पशुधनाचा आधार आहे़ मात्र, नजिकच्या काही वर्षांत चाऱ्याचा प्रश्न सातत्याने निर्माण झाला आहे़ यातून चाऱ्याचे वाढते दर, घटणारे दुग्धोत्पादन याचा मेळ बसणे कठीण झाले आहे़ परिणामी, शेतीपाठोपाठ मोठी आर्थिक उलाढाल असलेला हा व्यवसाय अडचणीत आला आहे़

प्रश्न : चाऱ्याचा पशुधनाच्या आरोग्यावर कसा परिणाम होतोय्?
गिते : पशुधनच नव्हे तर कोणत्याही सजीवास आरोग्य चांगले राखण्यासाठी सकस आहाराची गरज असते़ अगदी तसेच पशुधनासही सकस चारा, आहार गरजेचा आहे़ दुष्काळात दुभत्या पशुधनास सकस व पुरक आहार मिळत नाही़ परिणामी, प्रजननासाठी तयार असणाऱ्या दुभत्या जनावरांमध्ये गर्भपाताची समस्या निर्माण होते़ २०१५-१६ मधील दुष्काळी परिस्थितीतही ही समस्या प्रकर्षाने जाणवली होती़ त्यामुळे दुभत्या जनावरांमधील रिपीट ब्रिडींग म्हणजे प्रजननातील सातत्य ठेवायचे असेल व गर्भपात टाळायचे असतील तर जनावरांना कोणत्याही स्थितीत पुरक आहार उपलब्ध करुन द्यावाच लागेल़ 

प्रश्न : सकस आहाराची समस्या कशी सोडविली जाऊ शकते?
गिते : किमान दुभत्या पशुधनास तरी पोषक, पुरक आहार मिळावा यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी पाणी उपलब्ध असल्यास मका लागवड करावी़ मका हे पीक अडीच महिन्यात फुलोऱ्यात आल्यानंतर शेतावरच मका हार्वेस्टींग करुन मुरघास तयार केला जाऊ शकेल़ त्यामुळे शेतकऱ्यांनाही दुष्काळात जागेवर पैसे मिळतील व पशुधनास सकस आहारही मिळेल़ याबाबतची जागृती आम्ही शेतकऱ्यांमध्ये करीत आहोत़  बाहेरुन आणलेला चारा सर्व पशुधनास पुरेल असे चित्र सध्या नाही़ त्यामुळे परीसरात पाणी उपलब्ध असल्यास अशी पुरक उत्पादने घ्यावी लागतील़

प्रश्न : आपल्या स्तरावरुन काय प्रयत्न सुरु आहेत?
गिते : दुष्काळी परिस्थितीमध्ये दुग्धव्यवसाय टिकवून ठेवण्यासाठी विशेष सवलत म्हणून मराठवाडा पॅकेजअंतर्गत पुढील किमान दोन वर्षांसाठी ५ रुपये प्रतिलिटर अनुदान देण्याची योजना नियमित ठेवावी लागेल़ दुष्काळात जिल्ह्यातील जनावरांसाठी सकस आहार उपलब्ध व्हावा, यासाठी पश्चिम महाराष्ट्रातून सकस आहार उपलब्ध व्हावा, यासाठी तेथून मुरघास, वैरणीचे नियोजन करावे, जानेवारी ते जुलै पर्यंत मिनरल, कॅल्शियम पुरक आहार प्रत्येक जनावरांना पुरवठा व्हावा, यासाठी आम्ही आमच्या स्तरावरुन प्रयत्न करीत आहेत़ मात्र, संपूर्ण पशुधनाचा विचार केला असता, शासनस्तरावरुन या बाबी होणे गरजेच्या आहेत़ यामुळे नुकतेच पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांची भेट घेऊन उपरोक्त मागण्या त्यांच्याकडे विस्ताराने मांडल्या आहेत़ ते याबाबतीत सकारात्मक आहेत़

Web Title: Effect of breeding animals due to fierce fertility: Balasaheb Gite

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.