खून प्रकरणात आठ आरोपींना जन्मठेप; लातूर जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2022 10:06 PM2022-02-17T22:06:49+5:302022-02-17T22:07:04+5:30
१७ साक्षीदार तपासले सरकारी पक्षाच्या वतीने एकूण १७ साक्षीदार तपासण्यात आले.
लातूर : लातूर शहरातील संजय नगर येथे १६ एप्रिल २०१८ रोजी झालेल्या एका खून प्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए.व्ही. गुजराथी यांनी गुरुवारी ८ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा तसेच प्रत्येकी दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. जिल्हा सरकारी वकील संतोष व्ही. देशपांडे यांनी सांगितले.
आरोपी आणि मयत शादुल राज अहमद शेख यांचा बर्फाच्या गोळ्याचा व्यवसाय होता. या व्यवसायातील नफ्यावरून घटनेच्या दीड वर्षांपूर्वी त्यांच्यात भांडण झाले होते. या भांडणाचा राग मनात धरून आरोपी अन्वर सय्यद यांनी शादुल शेख यांना संजय नगर येथे बोलवून नेले. तेथे लोखंडी पाईपाला लटकवून हात-पाय बांधले.
लोखंडी रॉडने मारहाण केली. त्यात त्यांचा मृत्यू झाला, अशी तक्रार मयताच्या पत्नी शमीम शेख यांनी विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार अन्वर सय्यद व अन्य सात जणांवर कलम ३०२ तसेच १४८ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल झाला. तपासिक अधिकारी अण्णासाहेब पवार, सहायक पोलीस निरीक्षक संतोष जाधवर यांनी तपास करून जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
१७ साक्षीदार तपासले सरकारी पक्षाच्या वतीने एकूण १७ साक्षीदार तपासण्यात आले. प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराची साक्ष महत्वाची ठरली. आलेले पुरावे ग्राह्य धरून जिल्हा सत्र न्यायालय (क्र. १) चे न्यायाधीश ए.व्ही. गुजराथी यांनी आरोपी हाजीअली दस्तगीर सय्यद, युसुफ उर्फ गुड्डू फारुख शेख, जब्बार सत्तार सय्यद, शन्नो अन्वर सय्यद, अन्वर दस्तगीर सय्यद, दौल्या उर्फ दौलत बाबुमियाँ शेख, सलीम नजीर सय्यद, बाळू पंडित सूर्यवंशी यांना जन्मठेपेची शिक्षा, प्रत्येकी दहा हजारांचा दंड ठोठावला आहे.
तसेच १४८ कलमान्वये तीन वर्षांची शिक्षा सुनावली. तसेच दंडाच्या रकमेतून ६० हजार रुपये फिर्यादीला देण्याचे आदेश न्यायालयाने दिल्याची माहिती जिल्हा सरकारी वकील संतोष व्ही. देशपांडे यांनी दिली. त्यांना पैरवी अधिकारी पोलीस हवालदार राजेंद्र राठोड यांनी सहकार्य केले. या प्रकरणात सपोनि. बी.एम. तोटेवाड, पोलीस नाईक वाजिद चिकले यांनीही तपासात सहकार्य केले.