सुमन मोहिमेत लातूर जिल्ह्याचा डंका;८ आरोग्यवर्धिनी केंद्रांना राज्याच्या मानांकनाची मोहोर
By हरी मोकाशे | Published: March 15, 2024 06:28 PM2024-03-15T18:28:01+5:302024-03-15T18:28:44+5:30
सुरक्षित मातृत्व आश्वासन (सुमन) कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील ८ आरोग्य उपकेंद्रांचे मूल्यांकन करण्यात आले होते.
लातूर : गर्भधारणेनंतर सुरक्षित प्रसूती आणि नवजात अर्भकाची आवश्यक ती काळजी घेण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने विविध प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान, सुमन मोहिमेअंतर्गत राज्यस्तरीय पथकाकडून जिल्ह्यातील आठ आरोग्य वर्धिनी केंद्रांचे मूल्यांकन करण्यात आले. तेथील दर्जेदार सेवा- सुविधा पाहून मानांकनाची मोहोर उमटविली आहे.
जिल्ह्यात एकूण ५० प्राथमिक आरोग्य केंद्र असून त्याअंतर्गत २५२ आरोग्यवर्धिनी केंद्र आहेत. या केंद्रातून व उपकेंद्रातून आरोग्यविषयक विविध सेवा- सुविधा पुरविल्या जातात. दरम्यान, जिल्ह्यातील माता मृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी जिल्हा आरोग्य विभाग आणि जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडून सातत्याने वेगवेगळे उपक्रम राबविण्याचा प्रयत्न केले जात आहेत. जिल्हा परिषदेत लाइफलाइन कॉल सेंटर सुरू करण्यात आले आहे. तसेच आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून जनजागृती, तपासणी केली जात आहे. तर जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडून सिझेरियन अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. सुरक्षित मातृत्व आश्वासन (सुमन) कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील ८ आरोग्य उपकेंद्रांचे मूल्यांकन करण्यात आले होते. त्यामुळे लक्ष लागून होते. त्यात सर्व आरोग्य वर्धिनी केंद्रांना मानांकन मिळाले आहे.
लातूरच्या उपकेंद्रांचा राज्यभरात डंका...
सुमन कार्यक्रमांतर्गत राज्यात पहिल्यांदाच लातूर जिल्ह्यातील ८ आरोग्य वर्धिनी केंद्रांनी मूल्यांकन करून घेतले होते. सर्व उपकेंद्रांना मानांकन मिळाले आहे. त्यात पाखरसांगवी (ता. लातूर), सारोळा (ता. औसा), काजळ हिप्परगा (ता. अहमदपूर), घोणसी (ता. जळकोट), तोंडार, तोंडचीर, किनी यल्लादेवी, अवलकोंडा (ता. उदगीर) या उपकेंद्रांचा समावेश आहे. या उपकेंद्रांचा राज्यभर लौकिक झाला आहे.
१२ सेवा- सुविधांची तपासणी...
मुल्यांकनादरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गतची बाह्यरुग्ण, आंतररुग्ण, प्रसूतीगृह, राष्ट्रीय आरोग्य अभियान तसेच आरोग्य वर्धिनी केंद्रात दिल्या जाणाऱ्या १२ सेवांची तपासणी करण्यात आली होती. त्यात गर्भधारणा व बाळांतपणाच्या सेवा, नवजात आणि अर्भक आरोग्य, किशोरवयीन आरोग्य, कुटुंबकल्याण नियोजन सेवा, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम, तीव्र व सामान्य आजारांसाठी, असंसर्गजन्य आजारांसाठी, कान-नाक-घसा याबाबत सेवा, मौखिक आरोग्य, वयोवृद्धांची काळजी, आपत्कालीन वैद्यकीय आणि मानसिक आरोग्य सेवा यांचे मूल्यांकन झाले.
सेवा देण्यासाठी प्रयत्न...
सुमन उपक्रमासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच.व्ही. वडगावे यांच्या मार्गदर्शनाखाली माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. नितीन बोडके, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत कापसे, जिल्हा गुणवत्ता आश्वासन समन्वयक डॉ. पल्लवी रेड्डी यांनी सातत्याने परिश्रम घेतले.
राष्ट्रीय मानांकनासाठी प्रयत्न...
आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या नियोजनातून प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रातून दर्जेदार आरोग्य सुविधा दिल्या जात आहेत. त्यामुळे विविध उपक्रमात चांगले यश मिळत आहे. आता या उपकेंद्रांना राष्ट्रीय मानांकन मिळविण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत.
- डॉ. अर्चना पंडगे, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी.