चार वर्गांसाठी आठ बाय आठची एकच खोली! आर्वी गायरानातील मनपाची शाळा की 'कोंडवाडा'
By हणमंत गायकवाड | Published: January 15, 2024 04:23 PM2024-01-15T16:23:37+5:302024-01-15T16:26:14+5:30
वर्गखोल्या बांधून देण्याची आणि काही मूलभूत सुविधा पुरवण्याची मुख्याध्यापकांनी वारंवार विनंती केली. परंतु, त्याकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.
लातूर : शहरातील क्वाईल नगर झोपडपट्टीतून आर्वी गायरानामध्ये स्थलांतरित झालेल्या नागरिकांच्या मुलांसाठी मनपाच्या वतीने शाळा क्रमांक १० चालविली जाते. मात्र, या शाळेला ना इमारत, ना वर्गखोल्या, ना स्वच्छतागृह, ना किचन शेड. आठ बाय आठच्या एका खोलीत पहिली ते चौथीपर्यंतचे चार वर्ग चालविले जात असून, दाटीवाटीने बसवून ५३ मुलांना शिकविण्याची कसरत या शाळेतील दोन शिक्षकांना क1रावी लागत आहे.
वर्गखोल्या बांधून देण्याची आणि काही मूलभूत सुविधा पुरवण्याची मुख्याध्यापकांनी वारंवार विनंती केली. परंतु, त्याकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. लातूर शहरातून झोपडपट्टीतील नागरिक आर्वी गायरानांमध्ये स्थलांतरित झाल्यानंतर पुनर्वसनात घरे बांधून देण्यात आली. त्यातील एका घरामध्ये मनपाची शाळा क्रमांक १० चालविली जात आहेः परंतु या वर्गखोलीची अवस्था बिकट झालेली आहे.
उंदीर-घुशीने पोखरले...
उंदीर आणी घुशीने विटा-मातीचे बांधकाम पोखरून टाकले आहे. धोकादायक अवस्थेमध्ये मुलांची शाळा तिथे भरवली जाते.
आठ बाय आठच्या खोलीमध्ये पहिली ते चौथीचे विद्यार्थी बसवले जातात आणि सहा बाय आठच्या खोलीत शालेय पोषण आहाराचे साहित्य ठेवलेले आहे.
या आहेत मागण्या...
वर्गखोल्या बांधून द्याव्यात
कार्यालय व किचनसाठी स्वतंत्र खोली असावी.
विद्यार्थ्यांसाठी डेस्क असावेत. शिकविण्यासाठी बोर्ड हवेत.
शाळेला कम्पाऊंड वॉल, मजबूत गेट असावे.
मुला-मुलींसाठी स्वतंत्र टॉयलेट असावे.
किमान चार वर्गखोल्या असाव्यात.
आदी मागण्यांचे निवेदन मनपा प्रशासनाला मुख्याध्यापकांनी वारंवार दिलेल्या आहेत.
मुख्याध्यापक म्हणाले...
शाळेसाठी दोन वर्गखोल्या आहेत. त्यापैकी एका खोलीत शालेय पोषण आहाराचे साहित्य आणि दुसरे वर्ग भरविले जाते. एक खोली ६ बाय ८ ची असून, दुसरी खोली ८ बाय ८ ची आहे. दोन्ही खोल्या नादुरुस्त आहेत. धोकादायक आहेत. एका खोलीत शालेय पोषण आहाराचे साहित्य तर दुसऱ्या खोलीत वर्ग भरविले जातात. खोल्या मोडकळीस आल्याने वर्ग भरविण्याची भीती वाटते, असे मुख्याध्यापक अमोल इंद्राळे म्हणाले.
मुख्याध्यापकांचा पाठपुरावा...
मुख्याध्यापकांनी आयुक्त, उपायुक्त व शिक्षण अधिकाऱ्यांना निवेदने पाठवून वर्गखोली बांधून देण्याची मागणी केली. परंतु, त्या मागणीकडे दुर्लक्ष आहे. शाळेचे मुख्याध्यापक अमोल इंद्राळे यांनी १३ जून २०२२, २७ जानेवारी २०२२ आणि २१ मार्च २०२२ रोजी पत्र पाठवून वर्गखोली बांधकामाची तसेच शाळेची इमारत धोकादायक असल्याचे प्रशासनाला कळविले आहे. मात्र, त्यांच्या या मागणीची दखल आजपर्यंत घेतलेली नाही.