आरटीई प्रवेश निश्चित करण्यासाठी आठ दिवसांची मुदतवाढ

By संदीप शिंदे | Published: April 24, 2023 04:12 PM2023-04-24T16:12:14+5:302023-04-24T16:12:38+5:30

राज्यस्तरावरील सोडतीत १६६९ जागांसाठी १६४८ बालकांची निवड

Eight days extension for determining RTE admissions | आरटीई प्रवेश निश्चित करण्यासाठी आठ दिवसांची मुदतवाढ

आरटीई प्रवेश निश्चित करण्यासाठी आठ दिवसांची मुदतवाढ

googlenewsNext

लातूर : आर्थिक दुर्बल घटकातील बालकांना मोफत शिक्षण देता यावे, यासाठी आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. त्यानुसार जिल्ह्यातील २०० शाळांमध्ये १६६९ जागा असून, राज्यस्तरावरील सोडतीत १६४८ बालकांची निवड झाली आहे. निवड झालेल्यांना प्रवेश निश्चितीसाठी ३० एप्रिलपर्यत मुदत होती. मात्र, त्यास आता ८ मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याबाबत शिक्षण संचालकांनी शिक्षणाधिकाऱ्यांना सुचना केल्या आहेत.

आरटीई अंतर्गत जिल्ह्यात २०० शाळांची नोंदणी असून, या शाळांमध्ये १ हजार ६६९ जागा आहेत. या जागांवर प्रवेशासाठी ७ हजार ४५१ बालकांचे अर्ज आले होते. त्यानुसार ५ एप्रिल रोजी पुणे येथे राज्यस्तरीय सोडत काढण्यात आली. त्यामध्ये १६४८ बालकांची निवड करण्यात आली आहे. या निवड झालेल्या बालकांना २५ एप्रिलपर्यंत कागदपत्रांची पडताळणी करुन ३० एप्रिलपर्यंत प्रवेश निश्चित करण्याची मुदत देण्यात आली होती. मात्र, प्रवेशाला अपेक्षित गती न मिळाल्याने शिक्षण संचालकांनी आरटीई प्रवेशासाठी आता ८ मे पर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे ज्या बालकांना आरटीईत निवडीचे संदेश आले आहेत. त्यांनी पंचायत समितीस्तरावर कागदपत्रांची पडताळणी करुन संबधित शाळेत ८ मे पर्यंत प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.

आतापर्यंत ६२ बालकांचे प्रवेश निश्चित...
पुणे येथे ५ एप्रिल रोजी सोडत जाहीर झाली होती. त्यानंतर १२ एप्रिलपासुन पालकांना निवडीचे संदेश येत आहेत. मात्र, संदेश आल्यावरही अनेक पालकांनी अद्याप कागदपत्रांची पडताळणी करुन प्रवेश निश्चित केलेले नाहीत. जिल्ह्यात सोमवारी दुपारपर्यंत केवळ ६२ बालकांचे प्रवेश निश्चित झालेले होते. त्यामुळे पालकांनी लवकरात लवकर कागदपत्र पडताळणी करुन आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.

सोडतीत १ हजार ६४८ बालकांची निवड...
जिल्ह्यात आरटीईच्या १६६९ जागा आहेत. मात्र, पुणे येथे काढण्यात आलेल्या सोडतीमध्ये १६४८ जागांवरच निवड करण्यात आली आहे. मध्यंतरी आरटीईचे पोर्टलवर तांत्रिक अडचणी येत होत्या. त्या अडचणी आता दुर झाल्या आहेत. यंदा मागील वर्षीच्या तुलनेत दुप्पट अर्ज आले असल्याने अनेक पालकांना सोडतीत निवड न झाल्याने इतर शाळेत बालकांचे प्रवेश निश्चित करावे लागत आहेत.

Web Title: Eight days extension for determining RTE admissions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.