लातूरचा एकनाथ देवडे महाराष्ट्र संघाचा कर्णधार; विजय मर्चंट क्रिकेट ट्रॉफीसाठी निवड
By राजकुमार जोंधळे | Published: December 3, 2024 07:21 PM2024-12-03T19:21:40+5:302024-12-03T19:22:56+5:30
...आता त्याची गुजरात येथील सूरत येथे होणाऱ्या विजय मर्चंट क्रिकेट ट्रॉफीसाठी १६ वर्षांखालील महाराष्ट्र संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे.
महेश पाळणे -
लातूर : १४ वर्षांखालील वयोगटांत खोऱ्याने धावा करणाऱ्या लातूरच्या डावखुऱ्या एकनाथ (समर्थ) संतोष देवडेने अनेकवेळा क्रिकेटचे मैदान गाजविले आहे. या राष्ट्रीय स्पर्धेत सलग तीन षटके ठोकत त्याने आपली पात्रता यापूर्वीच सिद्ध केली होती. आता त्याची गुजरात येथील सूरत येथे होणाऱ्या विजय मर्चंट क्रिकेट ट्रॉफीसाठी १६ वर्षांखालील महाराष्ट्र संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे.
लातूरच्या पॅकर्स क्लबचा माजी खेळाडू तथा पुण्यातील स्पार्क क्रिकेट क्लब येथे सराव करणारा तथा आर्यन्स क्रिकेट क्लबकडून खेळणारा एकनाथ देवडे डावखुरा सलामी फलंदाज असून, त्याने यापूर्वी अनेकवेळा मैदान गाजविले आहे. बीसीसीआयच्यावतीने होणाऱ्या या विजय मर्चंट क्रिकेट स्पर्धेसाठी त्याची ही निवड झाली आहे.
६ ते २३ डिसेंबरदरम्यान या स्पर्धा होणार असून, यात पश्चिम बंगाल, तामिळनाडू, गोवा, पाँडेचरी, बडोदा आदी संघ सहभागी होणार आहेत. त्याच्या या निवडीचे स्वागत पॅकर्स क्रिकेट क्लबचे अध्यक्ष उल्हास भोयरेकर, सचिव दिवाकर शेट्टी, रणजीपटू प्रसाद कानडे, आशिष सूर्यवंशी, राज्य क्रीडा मार्गदर्शक जयराज मुंडे, मदन रेड्डी, अभय गडकरी, नवनाथ डांगे, सुशील सुडे, प्रशिक्षक राम हिरापुरे, संगीत रंदाळे, शफी टाके, कृष्णा राव, मोहसीन शेख यांनी केले आहे.
६२.३८ च्या सरासरीने केल्या होत्या धावा...
१४ वर्षांखालील वयोगटांतील राष्ट्रीय स्पर्धेत एकनाथने चमकदार कामगिरी केली होती. सलग तीन षटके एक अर्धशतक करत ६२.३८ च्या सरासरीने या स्पर्धेत ४८८ धावा कुटल्या होत्या. स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज तो ठरला होता.