एकनाथ देवडेची बॅट पुन्हा चमकली; सौराष्ट्रविरुध्द शतक, स्पर्धेतील दुसरी शंभरी
By राजकुमार जोंधळे | Published: February 3, 2024 07:36 PM2024-02-03T19:36:42+5:302024-02-03T19:38:08+5:30
डावखुऱ्या अष्टपैलू एकनाथने १८३ चेंडूत सौराष्ट्रविरुध्द १२६ धावा केल्या. यात १८ चौकारांचा समावेश आहे.
- महेश पाळणे
लातूर : राजकोट येथे सुरू असलेल्या पश्चिम विभागीय क्रिकेट स्पर्धेत लातूरच्या एकनाथ देवडेच्या उत्कृष्ट फलंदाजीची लय कायम राहिली आहे. त्याने शनिवारी सौराष्ट्रविरुध्द शतक ठोकत पराक्रम केला आहे. त्याचे हे स्पर्धेतील लगातार दुसरे शतक असून राज्याला संघाला पुन्हा एकदा सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेण्यात सिंहाचा वाटा उचलला आहे.
डावखुऱ्या अष्टपैलू एकनाथने १८३ चेंडूत सौराष्ट्रविरुध्द १२६ धावा केल्या. यात १८ चौकारांचा समावेश आहे. राजकोट येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत महाराष्ट्र संघाने प्रथम फलंदाजी करीत सर्वबाद १४७ धावा केल्या. तर सौराष्ट्राचा संघ पहिल्या डावात १७५ धावात आटोपला. दुसऱ्या डावात लातूरच्या एकनाथने १२६ धावा ठोकत संघाला सन्मानजनक २१७ धावापर्यंत नेऊन पोहोचविले. दुसऱ्या डावात सौराष्ट्राचा संघ तिसऱ्या दिवसअखेर ५ गड्यांच्या मोबदल्यात १५० धावा करू शकला. त्यामुळे हा सामना अनिर्णित राहिला. एकंदरित लातूरच्या एकनाथचा पश्चिम विभागीय क्रिकेट स्पर्धेतील फलंदाजीतील लय कायम राहिला आहे.
पाच डावात ३६७ धावा...
एकनाथने तीन सामन्यांत दोन शतक व एक अर्धशतकाच्या जोरावर पाच डावात ३६७ धावा केल्या. महाराष्ट्र संघाकडून सर्वाधिक धावा करणारा तो फलंदाज ठरला आहे. सोमवारी गुजरातविरुध्द महाराष्ट्राचा स्पर्धेतील शेवटचा सामना राहणार असून याही सामन्यात एकनाथची खेळी राज्यसंघाला उपयोगी पडेल, अशी आशा आहे.