मान्सूनवर 'अल निनो'चे सावट; जूननंतर पाणीटंचाई निवारणासाठी प्रशासन अलर्ट माेडवर !
By संदीप शिंदे | Published: April 12, 2023 08:06 PM2023-04-12T20:06:49+5:302023-04-12T20:10:02+5:30
१ जुलै ते ३१ ऑगस्टमध्ये पाणीटंचाई निवारणासाठी सव्वाचार कोटींचा आराखडा
लातूर : हवामान विभागाच्या अंदाजानुसार दक्षिण पॅसिफिक महासागरातील अल निनो या समुद्र प्रवाहाच्या सक्रियतेमुळे मान्सून पर्जन्यमानावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जूननंतर देखील पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागू शकतात. परिणामी, मान्सूनवर अल निनोचे सावट असल्याने प्रशासन अलर्ट मोडवर आले असून, आता १ जुलै ते ३१ ऑगस्टपर्यंत टंचाई निवारणासाठी सव्वाचार कोटी रुपयांचा विशेष आराखडा तयार करण्यात आला आहे.
जिल्हा प्रशासनाकडून दरवर्षी मार्च ते जूनपर्यंत टंचाई निवारणासाठी कृती आराखडा तयार करण्यात येत असतो. यावर्षीही ४ कोटी १६ लाख रुपयांच्या कृती आराखड्याला मंजुरी देण्यात आली आहे. मात्र, हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार दक्षिण पॅसिफिक महासागरातील अल निनो या समुद्र प्रवाहाच्या सक्रियतेमुळे पावसाळा लांबण्याची शक्यता आहे. त्यामुळे जून ते ऑगस्ट या काळात टंचाई भेडसावू शकते. परिणामी, प्रशासनाने जि.प. पाणीपुरवठा विभागाला सूचना करीत जुलै व ऑगस्ट महिन्यासाठी विशेष आराखडा तयार करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार विविध उपाययोजनांचा समावेश असलेला ४ कोटी ३४ लाख ८९ हजार रुपयांचा विशेष टंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यास मंजुरीही देण्यात आलेली आहे.
६०७ गावांमध्ये जाणवू शकते टंचाई...
१ जुलै ते ३१ ऑगस्ट या कालावधीत जिल्ह्यातील ५२४ गावे आणि ८३ वाड्या असे एकूण ६०७ गावांमध्ये टंचाई जाणवू शकते. त्यामुळे प्रशासनाने आराखडा तयार केला आहे. यामध्ये १०१ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे, ४७५ गावातील विहीर, विंधन विहिरीचे अधिग्रहण करणे, तात्पुरत्या पूरक नळयोजना राबविणे, विहिरीचे खाेलीकरण करणे, बुडक्या घेणे, विंधन विहिरी घेणे, विंधन विहिरीची विशेष दुरुस्ती करणे, प्रगती पथावरील नळयोजना पूर्ण करणे आदी उपाययोजनांचा समावेश आहे.
अधिग्रहणावर होणार सर्वाधिक खर्च...
मार्च ते जूनपर्यंत यापूर्वीच ४ कोटी १६ लाखांचा आराखडा मंजूर आहे. तर जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांसाठी ४ कोटी ३४ लाखांचा विशेष आराखडा तयार आहे. यामध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी १ कोटी ३७ लाख, खासगी विहीर, विंधन विहिरीचे अधिग्रहणावर २ कोटी ६ लाख तर विंधन विहिरी घेण्यासाठी १२ लाख खोलीकरणासाठी १२ लाख विंधन विहिरींच्या विशेष दुरुस्तीसाठी ३ लाख आणि नळयोजनांच्या विशेष दुरुस्तीसाठी ५४ लाख ५० हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
जलजीवनमुळे टंचाईची तीव्रता कमी होणार...
प्रत्येक कुटुंबाला पिण्यासाठी शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी जलजीवन योजना राबविण्यात येत आहे. त्यानुसार या योजनेची अनेक गावांत कामे पूर्ण झाली असून, काही गावांत प्रगतिपथावर आहे. त्यामुळे उन्हाळ्यात या गावांना जलजीवन अंतर्गत पाणीपुरवठा केल्यास टंचाईच्या झळा कमी होण्यास मदत होणार आहे. सोबतच टंचाई आराखड्यावरील खर्चाचा आकडाही कमी होणार आहे.