वृद्ध साहित्यिक, कलावंत निवडीला मुहूर्त लागेना; लातूर जिल्हा परिषदेत कलाकारांचा ठिय्या
By हरी मोकाशे | Published: July 22, 2024 07:44 PM2024-07-22T19:44:42+5:302024-07-22T19:44:58+5:30
राज्य शासनाच्या वतीने राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यिक व कलाकार मानधन योजना राबविण्यात येते.
लातूर : राज्य शासनाच्या राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यिक व कलाकार मानधन योजनेसाठी गेल्या तीन वर्षांपासून जिल्ह्यातील वृद्ध साहित्यिक, कलावंतांची निवड झाली नाही. त्यामुळे या कलाकारांतून नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान, सोमवारी प्रस्तावधारक कलाकारांनी जिल्हा परिषदेत धाव घेऊन निवड प्रक्रिया राबविण्यात यावी, अशी मागणी करीत ठिय्या मांडला होता.
आयुष्यभर कला आणि साहित्य क्षेत्राची सेवा केलेल्या साहित्यिक व कलावंतांना वयोवृद्ध कालावधीत व्यवस्थित उपजीविका करता यावी, म्हणून राज्य शासनाच्या वतीने राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यिक व कलाकार मानधन योजना राबविण्यात येते. या अंतर्गत जिल्ह्यातील ज्येष्ठ साहित्यिक व कलावंतांची समितीमार्फत निवड करण्यात येऊन मानधन दिले जाते. योजनेमुळे वृद्ध कलावंतांचे जीवनमान उंचावण्यास मदत होण्याबरोबर राज्यातील काही सांस्कृतिक कलाकृतींचे जतन व संवर्धन होण्यास मदत होते.
निवडीसाठी तारीख निश्चित करा...
राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन योजनेंतर्गत सन २०२१-२२, २०२२-२३ आणि २०२३-२४ या तीन वर्षांच्या कालावधीत जिल्ह्यातील ज्येष्ठ साहित्यिक व कलावंतांची निवड झाली नाही. दरम्यान, गत वर्षी जिल्हास्तरीय निवड समिती गठित करण्यात आली. या समितीने जिल्हा परिषदेकडे जिल्ह्यातील ज्येष्ठ कलावंतांची निवड करण्यासाठी तारीख निश्चित करावी, अशी मागणी केली. सोमवारी जिल्हा परिषदेत धाव घेऊन आपली मागणी लावून धरीत ठिय्या मांडला होता.
१ हजार ३५० प्रस्ताव पात्र...
योजनेच्या लाभासाठी तीन वर्षांच्या कालावधीत जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात प्रस्ताव दाखल झाले होते. समाजकल्याण विभागाकडून त्याची छाननी करण्यात आली. त्यात १ हजार ३५० प्रस्ताव पात्र झाले आहेत. त्यामुळे आता लवकरच निवड चाचणी होईल, अशी आशा होती. मात्र, अद्यापही निवड न झाल्याने जिल्हा निवड समितीचे अध्यक्ष फुलचंद अंधारे, उपाध्यक्ष ज्ञानोबा भिसे, सदस्य बालाजी गाडेकर यांच्यासह जवळपास दीडशे प्रस्तावधारकांनी ठिय्या मांडला होता.
नव्या आदेशाने नवा पेच...
राज्य शासनाने मार्चमध्ये योजनेत सुधारणा करीत जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्षपद जिल्हाधिकाऱ्यांकडे साेपविले आहे, तर सदस्य सचिव म्हणून जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी काम पाहावे, असे स्पष्ट केले आहे. यापूर्वी जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष हे अशासकीय होते, तर सदस्य सचिव अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी होते. नव्या आदेशामुळे कलावंत निवडीचा पेच निर्माण झाला आहे.
सदस्य सचिवांमार्फत प्रस्ताव... जिल्ह्यातील ज्येष्ठ साहित्यिक व कलावंतांच्या निवडीसाठी शासनाच्या नवीन आदेशानुसार जिल्हास्तरीय सदस्य सचिवांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव दाखल करण्यात येणार आहे. लवकरच निवड प्रक्रिया होईल.
- संतोषकुमार नाईकवाडी, समाजकल्याण अधिकारी.