निलंग्यातील ४८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी चुरस सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:16 AM2020-12-26T04:16:24+5:302020-12-26T04:16:24+5:30
निलंगा : तालुक्यातील ११६ पैकी ४८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. गावपातळीवर मोर्चेबांधणीस वेग आला आहे. त्यामुळे हिवाळ्यातही तालुक्यातील ...
निलंगा : तालुक्यातील ११६ पैकी ४८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. गावपातळीवर मोर्चेबांधणीस वेग आला आहे. त्यामुळे हिवाळ्यातही तालुक्यातील गावांतील राजकीय वातावरण तापू लागले आहे. तालुक्यातील निवडणुका चुरशीच्या होणार असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील होसूर, उस्तुरी, बसपूर, कासार बालकुंदा ,सावरी, गुराळ, जाजनुर ,वाडी शेडोळ, कासारसिरशी, कोराळी, वळसांगवी, वाक्सा, आनंदवाडी (अबु.), लांबोटा, माळेगाव (जे.), डोंगरगाव (हा.), ढोबळेवाडी/ म्हसोबावाडी, हंद्राळ, शिंगनाळ, टाकळी, बुजरुगवाडी, मुदगड एकोजी, गौर, अंबुलगा (मेन), औराद शहाजानी, बामणी, बडूर, केळगाव, हाडगा, शिरोळ- वांजरवाडा, शिऊर ,कोकळगाव, ताडमुगळी, नणंद, हासोरी (बु.), डांगेवाडी, खडक उमरगा, पिरुपटेलवाडी, माळेगाव (क.), हंचनाळ, रामतीर्थ, आनंदवाडी- गौर, ताजपूर, सरवडी, तगरखेडा, वांजरवाडा, आंबेवाडी- मसलगा आदी गावांत निवडणूक होत आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यास बुधवारपासून प्रारंभ झाला आहे. परंतु, दोन दिवसांत एकाही इच्छुकाने उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. शुक्रवारपासून ते रविवारपर्यंत शासकीय कार्यालयांना सुटी असल्याने सोमवारपासून नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास वेग येणार आहे. दरम्यान, गावपातळीवर इच्छुकांनी गाठीभेटी वाढविल्या असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील ४२८ सदस्यांना निवडून द्यावयाचे आहे. त्यासाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे.
भाजपा- काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला...
तालुक्यातील ग्रामपंचायतींवर माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर व माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे वर्चस्व राहिले आहे.
ग्रामपंचायती निवडणूक ही स्थानिक पुढाऱ्यांच्या प्रतिष्ठेची असते. त्याचे परिणाम विधानसभा निवडणुकीत दिसून येतात. तालुक्यात काँग्रेस व भाजपाचे वर्चस्व आहे. या निवडणुकीत माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर व त्यांचे छोटे बंधू अरविंद पाटील निलंगेकर हे प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. तर आता तालुक्यातील काँग्रेसची धुरा प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर यांच्यावर आहे. त्यांनीही प्रतिष्ठा पणाला लावली आहे. त्यांना अभय सोळुंके यांचे किती पाठबळ मिळते, हे मतमोजणीनंतर समजणार आहे. दरम्यान, जिल्हा परिषद उपाध्यक्षा भारतबाई सोळुंके यांच्या अंबुलगा गटात ८ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. त्यामुळे सर्वांचे लक्ष वेधले आहे.