लातुरात १० बाजार समित्यांच्या निवडणुका; यंदा शेतकरीही होणार उमेदवार

By संदीप शिंदे | Published: March 29, 2023 05:29 PM2023-03-29T17:29:20+5:302023-03-29T17:33:39+5:30

राजकीय वातावरण तापणार, २२१८८ मतदार बजावणार हक्क

Elections of 10 Market Committees in Latur; Farmers will also be candidates this year | लातुरात १० बाजार समित्यांच्या निवडणुका; यंदा शेतकरीही होणार उमेदवार

लातुरात १० बाजार समित्यांच्या निवडणुका; यंदा शेतकरीही होणार उमेदवार

googlenewsNext

लातूर : जिल्ह्यातील दहा कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. यासाठी नामनिर्देशपत्र भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापणार आहे. कोणाची कोणासोबत आघाडी होते हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे. दरम्यान, दहा बाजार समित्यांच्या निवडणुकीत २२ हजार १८८ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तर यंदा प्रथमच या निवडणुकीत शेतकरीही उमेदवार राहणार आहेत.

अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर जिल्ह्यातील लातूर, औसा, उदगीर, चाकूर, औराद शहाजानी, निलंगा, देवणी, जळकोट, अहमदपूर, रेणापूर या बाजार समित्यांची निवडणूक जाहीर झाली आहे. यासाठी २७ मार्च रोजी अधिसूचना जाहीर झाली. याच दिवसांपासून नामनिर्देशनपत्र सुरू झाले आहेत. नामनिर्देशनत्रे दाखल करण्याची शेवटची तारीख ३ एप्रिल आहे. ५ एप्रिल रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. ६ एप्रिल रोजी वैध नामनिर्देशनपत्रांची सूची प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ६ ते २० एप्रिलदरम्यान उमेदवारास अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. २१ एप्रिल राेजी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल. तसेच चिन्हांचेही वाटप केले जाणार आहे.

या तारखेला होणार मतदान...
लातूर, औसा, उदगीर, चाकूर या बाजार समित्यांसाठी २८ एप्रिल रोजी सकाळी ८ ते ४ या वेळेत मतदान होईल. यानंतर लगेचच मतमोजणी होणार आहे. तर औराद शहाजानी, निलंगा, देवणी, जळकोट, अहमदपूर, रेणापूर बाजार समित्यांसाठी ३० एप्रिल रोजी मतदान होईल व याच दिवशी निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात येईल. शिरुर अनंतपाळ बाजार समितीची निवडणूक निधी नसल्याने सुरू नसल्याचे जिल्हा उपनिबंधक कार्यालयातून सांगण्यात आले.

बाजार समितीसाठी २२ हजार १८८ मतदार...
जिल्ह्यातील दहा बाजार समित्यांच्या निवडणुकीत २२ हजार १८८ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यात लातूर बाजार समितीसाठी ५९८२, औसा २७१९, उदगीर ३३७५, चाकूर १४६९, औराद शहाजानी १२७६, निलंगा १ हजार ७३७, देवणी ९४७, जळकोट १०८९, अहमदपूर २१७५, रेणापूर १ हजार ४१९ मतदार आहेत. दरम्यान, दहा बाजार समित्यांसाठी निवडणूक होत असून, चार बाजार समित्यांसाठी २८ आणि सहा बाजार समित्यांसाठी ३० एप्रिल रोजी मतदान होणार आहे.

१८ संचालकांची होणार निवड
जिल्ह्यातील दहा बाजार समित्यांमध्ये प्रत्येकी १८ संचालकांची निवड होणार आहे. यात सहकारी संस्था मतदारसंघातून सर्वसाधारण ७, महिला २, इमाव १, भटक्या-विमुक्त जाती १, ग्रामपंचायत मतदारसंघातून सर्वसाधारण २, अनुसूचित जाती-जमाती १, आर्थिक दुर्बल घटक १, व्यापारी मतदारसंघातून २, हमाल व तोलारी मतदारसंघातून १ असे १८ संचालकांची निवड करण्यात येणार आहे.

राजकीय घडामोडींना येणार वेग
बाजार समितीच्या निवडणुका जाहीर झाल्यामुळे इच्छुक उमेदवार कामाला लागले आहेत. राजकीय पक्षांकडून निवडणुकीत निवडून येणाऱ्या सक्षम उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. यानंतर राजकीय घडामोडींना वेग येणार असून, प्रचाराचा धुरळाही उडणार आहे.

Web Title: Elections of 10 Market Committees in Latur; Farmers will also be candidates this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.