विजेचा धक्का; वडिलांना वाचवताना मुलाचा मृत्यू
By राजकुमार जोंधळे | Published: October 10, 2024 04:32 AM2024-10-10T04:32:30+5:302024-10-10T04:33:01+5:30
औसा ठाण्यात नाेंद : नागरसोगा शिवारातील घटना...
राजकुमार जाेंधळे / औसा (जि. लातूर) : कडबाकुट्टी करताना वडिलांना विजेचा धक्का बसला. त्यांना वाचविण्यासाठी धडपड करणाऱ्या मुलाचाही विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना नागरसाेगा (ता. औसा) शिवारात बुधवारी पहाटे घडली. यामध्ये वडील आणि मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, औसा पाेलिस ठाण्यात याची नाेंद करण्यात आली आहे. शेतकरी तानाजी विश्वनाथ मुसांडे (वय ५०) व त्यांचा मुलगा कृष्णा तानाजी मुसांडे (वय २५) असे मयत पिता-पुत्राचे नाव आहे.
औसा तालुक्यातील नागरसाेगा येथील शेतकरी तानाजी आणि मुलगा कृष्णा हे शेतीबराेबरच दुधाचा व्यवसाय करतात. मंगळवारी रात्री त्यांनी शेतातच मुक्काम केला हाेता. बुधवारी पहाटेच्या सुमारास ते नेहमीप्रमाणे पशुधनाला चारा म्हणून कडबाकुट्टीचे काम करत हाेते. यावेळी वडिलांना विजेचा धक्का बसला. हे मुलाच्या लक्षात आल्याने त्याने वडिलांना वाचविण्याची धडपड केली असता, त्यालाही विजेचा धक्का बसला. यामध्ये दोघाही पिता-पुत्रांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
शेतीबराेबरच सुरू हाेता दूध विक्रीचा व्यवसाय...
दाेघांवरच कुटुंबाचा गाडा चालत हाेता. या घटनेने कुटुंबावर दु:खाचा डाेंगर काेसळला आहे. घटनास्थळी पाेलिसांनी भेट देऊन पंचनामा केला असून, जवळगा (पो.) प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले. वडील आणि मुलाला उच्च दाबाचा विजेचा धक्का बसल्याने मृत्यू झाला, असे डॉ. बिलाल मिर्झा यांनी सांगितले.
विजेचा धक्क्याने दाेघांचा जागीच मृत्यू...
मयत वडील-मुलगा नेहमीप्रमाणे रात्री शेतात जागलीला गेले हाेते. पहाटे पशुधनाला चारा टाकण्यासाठी वडिलांनी कडबाकुट्टी सुरू केली. चारा तयार करताना त्यांना विजेचा धक्का बसला. यावेळी लांब थांबलेल्या मुलाच्या लक्षात आले. त्याने वडिलांना वाचविण्यासाठी धडपड केली असता त्यालाही विजेचा धक्का बसला. विजेचा प्रवाह अधिक असल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला.