उकाडा हाेत असल्याने एसटीच्या टपावर झोपण्यासाठी गेलेल्या चालकाला विजेचा धक्का
By राजकुमार जोंधळे | Updated: May 6, 2024 00:18 IST2024-05-06T00:17:45+5:302024-05-06T00:18:19+5:30
नागपूरच्या एसटी चालकावर लातुरात सुरु आहेत उपचार

उकाडा हाेत असल्याने एसटीच्या टपावर झोपण्यासाठी गेलेल्या चालकाला विजेचा धक्का
राजकुमार जाेंधळे / लातूर : उकाडा हाेत असल्याने एसटीच्या टपावर झोपण्यासाठी गेलेल्या चालकाचा हात विद्युत तारेला लागला अन् विजेचा धक्का लागला. यामध्ये त्यांचा हात भाजला असून, ही घटना शनिवारी निलंगा येथे घडली. त्यांच्यावर लातूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी रविवारी दिली.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संरक्षणासाठी गडचिरोली येथील पोलिसांचे एक पथक निलंगा येथे शनिवारी दाखल झाले. त्याच्या मुक्कामाची व्यवस्था निलंगा शहरालगत असलेल्या जाऊ येथील शासकीय मुलींच्या शाळेत करण्यात आली होती. दरम्यान, तापमानाचा पारा वाढत असल्याने उन्हामुळे अंगाची लाहीलाही हाेत आहे. रात्रीही उकाडा वाढल्याने पोलिसांना घेऊन आलेल्या एसटीचे चालक प्रवीण महादेव पेंडाम (वय ३५, रा. नागपूर) हे वसतिगृहालगत थांबविलेल्या एसटीच्या टपावर ते झाेपण्यासाठी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास गेले हाेते. एसटी येथे थांबविली हाेती. तेथेच वर विजेची तार हाेती. त्या विजेच्या तारेला प्रवीण पेंडाम यांचा हात लागल्याने शाॅक लागला. तारांच्या घर्षणाने ठिणगी पडल्याने सर्वजण धावून आले. यावेळी ते एसटीच्या टपावरच कोसळले. घटनास्थळी धावून आलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांना तातडीने लातूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.