थकीत बिलामुळे निलंगा नगरपालिकेचा वीजपुरवठा तोडला, नागरिकांची पाण्यासाठी भटकंती

By हरी मोकाशे | Published: September 29, 2022 06:44 PM2022-09-29T18:44:07+5:302022-09-29T18:45:13+5:30

निलंगा नगरपालिकेकडे २ कोटी ११ लाखांची थकबाकी आहे

Electricity supply to Nilanga municipality cut off due to overdue bill, citizens wander for water in Navaratrotsa | थकीत बिलामुळे निलंगा नगरपालिकेचा वीजपुरवठा तोडला, नागरिकांची पाण्यासाठी भटकंती

थकीत बिलामुळे निलंगा नगरपालिकेचा वीजपुरवठा तोडला, नागरिकांची पाण्यासाठी भटकंती

googlenewsNext

निलंगा (जि. लातूर) : निलंगा नगरपालिकेने २ कोटी ११ लाखांची थकित बाकी न भरल्यामुळे महावितरणने वीजपुरवठा तोडला आहे. परिणामी, ऐन नवरात्रोत्सवात शहरातील नागरिकांना पाणीटंचाईस सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे.

सध्या नवरात्रोत्सव सुरु असून विजयादशमी सण तोंडावर आला आहे. अशा परिस्थिती शहरवासियांना निर्जळीस सामाेरे जावे लागत आहे. पालिकेकडे २ कोटी ११ लाखांची थकबाकी असल्यामुळे महावितरणने विद्युत पुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे माकणी धरणावरून जलवाहिनीद्वारे होणारा पाणीपुरवठा बंद झाला आहे. परिणामी, शहरातील जलकुंभ कोरडेठाक पडले आहेत. पालिकेच्या कारभाराचा शहरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष देऊन शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी होत आहे.

माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी निलंग्यास पाणीटंचाई जाणवू नये म्हणून ४० किमी जलवाहिनी टाकून ही योजना सुरु केली आहे. सन २०२० मध्ये माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी या जलवाहिनीचे नूतनीकरण करून १२५ कोटींची अद्ययावत यंत्रणा उभी केली. एवढी मोठी पाणीपुरवठा योजना जिल्ह्यात कुठेच अस्तित्वात नाही. या योजनेचे काम सुरु असताना २४ तास पाणीपुरवठा होणार असल्याची घोषणा तत्कालिन नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे यांनी केली होती. प्रारंभी या नवीन योजनेचे कनेक्शन देताना मीटर बसवण्यात आले होते. तसेच पालिकेअंतर्गतचे शहरातील ७० ते ८० बोअर कायमस्वरूपी बंद करण्यता आले. मात्र, आता नगरपालिकेने महावितरणचे थकित वीजबिल न भरल्यामुळे शहरातील नागरिकांना पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे पालिकेच्या कारभारावर संताप व्यक्त केला जात आहे.

खाजगी टँकरला मागणी वाढली...
निलंगा पालिकेने वीजबिलापोटी महावितरणची थकबाकी भरली नाही. परिणामी, महावितरणने माकणी प्रकल्पावरुन शहरास होणाऱ्या पाणीपुरवठ्याचे वीज कनेक्शन तोडले आहे. त्यामुळे तीन दिवसांपासून शहरातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. परिणामी, बंद झालेले खाजगी टँकर पुन्हा सुरू झाले आहेत. पाण्यासाठी टँकरला मागणी वाढली आहे. नगरपालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे शहरातील नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.

Web Title: Electricity supply to Nilanga municipality cut off due to overdue bill, citizens wander for water in Navaratrotsa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.