लातूर जिल्ह्यात थकीत बिलापोटी पाणी पुरवठा योजनांचा वीज पुरवठा खंडित
By संदीप शिंदे | Published: March 23, 2023 07:14 PM2023-03-23T19:14:26+5:302023-03-23T19:14:38+5:30
वीजबिल भरणा करण्यासाठी महावितरणचे आवाहन
लातूर : वीजबिल वसूलीसाठी अनेक प्रयत्न करूनही वीजबिल भरणा न करणाऱ्या जिल्ह्यातील काही सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांचा वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई महावितरणला करावी लागली. पुरवठा खंडित करण्यात आलेल्यांमध्ये निलंगा, औसा, अहमदपूर व उदगीर येथील उच्चदाब सार्वजनिक पाणी पुरवठा योजनांचा समावेश आहे.
मार्च २०२३ अखेरच्या तपशीलानुसार निलंगा नगर परिषदेकडे २.९६ कोटी तर औसा नगर परिषदेकडे ६८ लाख रुपयांची वीजबिल थकबाकी आहे. थकबाकीपोटी त्यांच्या प्रत्येकी तीन जोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत. उदगीर नगर परिषदेकडे १८.१३ कोटी थकले असल्याने त्यांचाही वीज पुरवठा खंडित करण्यात आला. अहमदपूर पालिकेने २. ६५ कोटी रुपयांचे वीजबिल थकविल्याने तेथील दोन जोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत.
लातूर जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा योजनांपैकी पानगाव, राचन्नावाडी आणि शिवपूर योजनांकडे ७.७८ कोटी रुपयांचे वीजबिल थकले आहे. थकबाकीपोटी पानगाव व राचन्नावाडी येथील प्रत्येक एक आणि शिवपूर येथील दोन जोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत. खंडित वीज पुरवठ्यामुळे होणारी गैरसोय टाळून अखंडित वीज पुरवठ्याचा लाभ घेण्यासाठी सर्व वीज ग्राहकांनी आपली वीज देयके नियमितपणे भरून महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन अधीक्षक अभियंता मदन सांगळे यांनी केले आहे.