खांबात विद्युत प्रवाह उतरला, याला जबाबदार कोण? जाब विचारत सरपंचास बेदम मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 12:25 IST2025-01-18T12:24:24+5:302025-01-18T12:25:00+5:30
ही धक्कादायक घटना निलंगा तालुक्यातील शेडोळवाडी येथील आहे. निलंगा पोलिसांत तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

खांबात विद्युत प्रवाह उतरला, याला जबाबदार कोण? जाब विचारत सरपंचास बेदम मारहाण
निलंगा (जि. लातूर) : गावातीलच काही तरुणांनी ग्रामपंचायतमध्ये घुसून सरपंचाला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ही धक्कादायक घटना निलंगा तालुक्यातील शेडोळवाडी येथील आहे. माझ्या दारात महावितरणचा पोल का लावला म्हणून सरपंचास बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना वाडीशेडोळ (ता. निलंगा) येथे घडली. याप्रकरणी शनिवारी निलंगा पोलिस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी सरपंच शेख रुबाब आणि ग्रामसेवक पाटील एन. एस. यांनी निलंगा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ग्रामपंचायत मध्ये घुसून सरपंचाला मारहाण करत संगणक, वायफाय आणि इतर साहित्याची तोडफोड करत शासकीय कामात अडथळा आणल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. पोलिसांनी सांगितले, वाडीशेडोळ येथील सरपंच रुबाब शेख व ग्रामसेवक सीमा माळी हे १६ जानेवारी रोजी दुपारी १२ ते १ वाजेच्या दरम्यान ग्रामपंचायत कार्यालयात बैठकीसाठी बसले होते. यावेळी बासिद पठाण व वाजिद पठाण हे दोघे कार्यालयात आले आणि आमच्या दारात विजेचा पोल रोऊ नका, असे म्हणाले. हा विषय महावितरण कार्यालयांतर्गत येतो, त्यामुळे आम्ही काही सांगू शकत नाही, असे सरपंच रुबाब शेख यांनी म्हणताच त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली. यावेळी ग्रामपंचायत कार्यालयातील संगणक, वायफाय बॅटरी, प्रिंटरची तोडफोड करण्यात आली. घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून सरपंच, ग्रामसेवकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पोलमध्ये करंट उतरला, याला जबाबदार कोण? जाब विचारत ग्रामपंचायतमध्ये घुसून सरपंचाला मारहाण; निलंगा तालुक्यातील शेडोळवाडी येथील घटना. #latur#marathwadapic.twitter.com/b7apxxz8Vp
— Lokmat Chhatrapati Sambhajinagar (@milokmatabd) January 18, 2025
सरपंच रुबाब चाँदसाब शेख यांनी निलंगा पोलिस ठाणे येथे शनिवारी दुपारी दिलेल्या तक्रारीवरून बासिद महबूब पठाण, वाजीद महबूब पठाण, महबूब शब्बीर पठाण या तिघांविरुद्ध धमकी, मारहाण व शासकीय कामात अडथळा केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ राम गोमारे करत आहेत.