वसतिगृहाच्या विद्युतीकरणाचे काम पूर्ण, लवकरच सुविधांसह कोविड रुग्णालय सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:19 AM2021-04-25T04:19:14+5:302021-04-25T04:19:14+5:30
जळकोट तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने गंभीर रुग्णांना उदगीर अथवा लातूरला पाठवावे लागत आहे. आर्थिक परिस्थिती चांगली असलेले रुग्ण ...
जळकोट तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने गंभीर रुग्णांना उदगीर अथवा लातूरला पाठवावे लागत आहे. आर्थिक परिस्थिती चांगली असलेले रुग्ण नांदेड, हैदराबाद येथील खासगी रुग्णालयाकडे धाव घेत आहेत. त्यामुळे गरीब रुग्णांची मोठ्या प्रमाणात अडचण होत असल्याचे पाहून राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी सातत्याने प्रशासनास निर्देश दिले. आवश्यक साहित्य उपलब्ध करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावाही केला.
दरम्यान, अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, आरोग्य उपसंचालक डॉ. एकनाथ माले यांच्या तीन बैठका झाल्या. यावेळी बाजार समितीचे माजी सभापती मन्मथप्पा किडे, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मारुती पांडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अर्जुन पाटील आगलावे, काँग्रेसचे शहराध्यक्ष महेश धुळशेट्टे, खादर लाटवाले, शिवसेना तालुकाप्रमुख संगम टाले, जिल्हा बँकेचे संचालक धर्मपाल देवशेट्टे, गोविंद भ्रमण्णा व तालुक्यातील विविध गावचे सरपंच, उपसरपंचांनी जळकोट येथे डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल सुरू करण्याची मागणी लावून धरली होती. तेव्हा राज्यमंत्री बनसोडे यांनी सदरील हॉस्पिटल लवकर सुरू करण्यात येईल. तसेच याठिकाणी १०० खाटांची व्यवस्था करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. त्यासाठी तत्काळ शासकीय वसतिगृह हस्तांतरित करण्यात यावे, असे निर्देश दिले होते.
दोन दिवसात रुग्णालय सुरु...
राज्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार तत्काळ वसतिगृहातील विद्युतीकरणाची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. केवळ आता स्वच्छता राहिली आहे. ती पूर्ण होताच दोन- चार दिवसांमध्ये याठिकाणी सदरील हॉस्पिटल सुरू करण्यात येईल, असे आरोग्य उपसंचालक डॉ. एकनाथ माले व डॉ. जगदीश सूर्यवंशी यांनी सांगितले.
राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे सर्व सुविधांनी युक्त रुग्णालय सुरू होणार आहे. त्यामुळे जळकोट तालुक्यातील कोविड रुग्णांना अन्य ठिकाणी उपचारासाठी जाण्याची गरज पडणार नाही. याठिकाणी दोन व्हेंटिलेटर तसेच दोन तज्ज्ञ डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात येणार आहेत. त्यामुळे रुग्णांची होणारी परवड थांबण्यास मदत होणार आहे.