जिल्ह्यात हत्तीरोग संक्रमण पडताळणी सर्व्हेक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:22 AM2021-09-26T04:22:15+5:302021-09-26T04:22:15+5:30
राज्यातील हत्तीरोग प्रवण जिल्ह्यात लातूरचा समावेश आहे. जिल्ह्यातून हत्तीरोग हद्दपार करण्यासाठी सन २००४ पासून हिवताप विभागामार्फत सामुदायिक औषधोपचार मोहीम ...
राज्यातील हत्तीरोग प्रवण जिल्ह्यात लातूरचा समावेश आहे. जिल्ह्यातून हत्तीरोग हद्दपार करण्यासाठी सन २००४ पासून हिवताप विभागामार्फत सामुदायिक औषधोपचार मोहीम राबविण्यात येत होती. या मोहिमेमुळे हत्तीरोग दुरीकरण अंतिम टप्प्यात आले असल्याने जिल्ह्यातील सामुदायिक औषधोपचार मोहीम बंद करण्यात आली आहे. दरम्यान, हत्तीरोग रक्त दुषिताचे प्रमाण एक टक्क्यापेक्षा कमी आल्याची खातरजमा करुन घेण्यासाठी २७ ते ३० सप्टेंबर या कालावधीत हत्तीरोग संक्रमण पडताळणी सर्व्हेक्षण मोहीम राबविण्यात येणार आहे.
या मोहिमेअंतर्गत ६ ते ७ वर्षे वयोगटातील निवडक विद्यार्थ्यांची घरोघरी जाऊन अथवा शाळेत बोलावून घेऊन एफटीएस किट्समार्फत रक्तनमुना तपासणी केली जाणार आहे. यापूर्वी ही मोहीम जिल्ह्यात सन २०१७ व २०१९ मध्ये राबविण्यात आली होती. त्यात लातूर जिल्हा उत्तीर्ण झाला होता. आता या मोहिमेत पुन्हा जिल्हा उत्तीर्ण झाल्यास सामुदायिक औषधोपचार मोहिमेतून जिल्हा बाहेर पडेल आणि सामुदायिक औषधोपचार मोहीम पूर्णपणे बंद करण्यात येईल, असे जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. आर.आर. शेख यांनी सांगितले.
१६ पथकांची केली नियुक्ती...
या मोहिमेस सोमवारपासून प्रारंभ होत आहे. त्यासाठी वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आशा स्वयंसेविका व शिक्षकांची १६ पथके नियुक्त करण्यात आली आहे. या कर्मचा-यांना गुरुवारी आरोग्य उपसंचालक कार्यालयात प्रशिक्षण देण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. आर.आर. शेख यांनी दिली.
जिल्ह्यातील ६६ गावांत मोहीम...
ही मोहीम जिल्ह्यातील निवडक ६६ गावांत राबविण्यात येणार आहे. दरम्यान, जिल्हा टास्क फोर्स समितीची बैठक होऊन तयारीचा आढावा घेण्यात आला. या सर्व्हेक्षणास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., सीईओ अभिनव गोयल, आरोग्य उपसंचालक डॉ. एकनाथ माले, हिवताप विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. संजय ढगे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हणमंत वडगावे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. आर.आर. शेख यांनी केले आहे.