किल्लारी तालुका निर्मितीसाठी पुन्हा एल्गार; ९ ऑगस्टपासून रास्तारोको, बेमुदत साखळी आंदोलन
By संदीप शिंदे | Published: August 3, 2023 05:34 PM2023-08-03T17:34:40+5:302023-08-03T17:36:56+5:30
शासनाकडून जाेपर्यंत मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत लढा सुरुच राहील, असा निर्धारही यावेळी करण्यात आला.
किल्लारी : औसा तालुक्यातील किल्लारीला तालुक्याचा दर्जा देण्यात यावा, या मागणीसाठी मागील ३० वर्षांपासून लढा सुरु आहे. मात्र, प्रशासनाकडून कोणतीही हालचाल होत नसल्याने ९ ऑगस्टपासून रास्ता रोको, बेमुदत साखळी आंदोलन करण्याचा निर्णय तालुका निर्मिती कृती समितीच्या बैठकीत बुधवारी घेण्यात आला. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
किल्लारी तालुका व्हावा, यासाठी परिसरातील ५२ गावातील ग्रामपंचायतीने लेखी संमतीपत्र दिले आहे. किल्लारी हे ३० हजार लोकसंख्येचे गाव असून, याठिकाणी मोठी बाजारपेठ, बाजार समिती, पोलीस ठाणे, महाविद्यालये, आठ शाळा, आयटीआय, ग्रामीण रुग्णालय असून, दरराेज ५० गावांचा संपर्क किल्लारी गावासोबत असतो. मागील ३० वर्षांपासून मागणी करुनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे ९ ऑगस्ट अर्थात क्रांती दिनापासून रास्ता रोको, बेमुदत साखळी आंदोलन करण्याचा निर्णय कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
शासनाकडून जाेपर्यंत मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत लढा सुरुच राहील, असा निर्धारही यावेळी करण्यात आला. बैठकीस उस्मानाबाद जनता बँकेचे संचालक निवृत्ती भोसले, महादेव पाटील, भाजपाचे प्रकाश पाटील, माजी उपसभापती किशोर जाधव, चेअरमन किरण बाबळसुरे, माजी सरपंच विश्वास काळे, सरपंच युवराज गायकवाड, माजी जि.प. सदस्य दिलीप लोहार, अरुण अत्तार, रिपाईचे हरीश डावरे, देविदास पवार, उपसरपंच बाबुराव बिराजदार, सतीष भोसले, रमेश हेळंबे, भुकंपग्रस्त कृती समितीचे अमर बिराजदार, डॉ. नोगजा, दिपक पाटील, विजय भोसले, डॉ. राजेश गुजिटे, पप्पु भोसले, व्यापारी असोशिएशनचे अध्यक्ष शरद भोसले, प्रकाश मिरगे, किशोर भोसले, सचिन माने, विनोद बाबळसुरे, अशोक गावकरे आदी उपस्थित होते.