कार्यालयीन कामकाजाच्या वेळेचा कर्मचाऱ्यांना विसर!
By आशपाक पठाण | Published: August 9, 2023 05:33 PM2023-08-09T17:33:50+5:302023-08-09T17:34:25+5:30
औशातील शासकीय कार्यालयात वेळेआधीच कर्मचाऱ्यांची दांडी
आशपाक पठाण, औसा (जि. लातूर) : राज्य सरकारने शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा केला आहे. हा निर्णय घेताना सर्वच शासकीय कार्यालयाची कामकाजाची वेळ वाढवून सकाळी ९:४५ ते सायंकाळी ६:१५ ही करण्यात आली. मात्र, या निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र औसा येथील विविध शासकीय कार्यालयांचे आहे. कार्यालयीन कामकाजाच्या वेळेचा कर्मचाऱ्यांनाच विसर पडला असून, याचा फटका मात्र सर्वसामान्यांना बसत आहे.
येथील कोणत्याही शासकीय कार्यालयात कामकाजाच्या वेळेसंदर्भात फलक लावला नसल्याने नागरिकांनाही याबाबत कोणाकडे तक्रार करावी, असा प्रश्न आहे. येथील तहसील कार्यालय, पंचायत समिती व नगरपालिका कार्यालयात नागरिकांना आपल्या कामासाठी सतत जावे लागते. सकाळी कर्मचारी तर उशिराने अनेकदा कार्यालयात येतात व दुपारनंतर कर्मचारी कार्यालयात राहत नाहीत. त्यामुळे लोकांना सारखे हेलपाटे मारावे लागत असतात ही वस्तुस्थिती आहे. सर्वच शासकीय कार्यालयात आता कर्मचाऱ्यांच्या हजेरीसाठी थंब मशीन बसवण्यात आले आहेत. मात्र, कोरोनाकाळापासून त्या बंदच आहेत. त्यामुळे कर्मचारी बेफिकीरपणे वागत आहेत. त्याचा नागरिकांना फटका बसत आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
सर्व कार्यालयांना सूचना करणार...
कार्यालयीन कामकाजाच्या वेळा पाळण्याबाबत सर्वच शासकीय कार्यालयांना सूचना करण्यात येईल. वेळेसंदर्भात दर्शनी भागात फलक लावला जाईल. कामचुकार कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात येईल व कामकाजाची वेळ पाळण्यासंदर्भात सूचना दिल्या जातील. असे तहसीलदार भरत सूर्यवंशी यांनी सांगितले, तर कार्यालयीन कामकाजाच्या संदर्भात तातडीने कार्यवाही करण्यात येईल. कामकाजाच्या वेळेचा फलक आजच दर्शनी भागावर लावण्यात येणार असल्याचे गटविकास अधिकारी युवराज म्हेत्रे यांनी सांगितले.
कार्यालयीन वेळेत हजर राहण्याच्या सूचना...
शहरातील नागरिक रोजच कामासाठी पालिकेत येतात. काही कर्मचारी हे सायंकाळी सात वाजेपर्यंत काम करतात, तर काही कर्मचारी वसुली किंवा अन्य कामासाठी कार्यालयाबाहेर गेलेले असतात. इतर आवश्यक कामासाठी कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळेत हजर राहण्याच्या सूचना देण्यात येतील. तसेच कामकाजाच्या वेळेचा फलक पालिकेत लावण्यात येईल, असे औसा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे यांनी सांगितले.