लातूर जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना पदोन्नतीची लागली उत्सुकता
By हरी मोकाशे | Published: September 16, 2023 07:11 PM2023-09-16T19:11:07+5:302023-09-16T19:11:35+5:30
शासनाच्या निर्देशानुसार दरवर्षी सप्टेंबरमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती अंतर्गतच्या गट ड आणि क मधील कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यासाठीची प्रक्रिया राबविण्यात येते.
लातूर : सप्टेंबर महिना उजाडला की, जिल्हा परिषदेअंतर्गतच्या सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नतीस पात्र ठरणाऱ्या गट ड आणि क मधील कर्मचाऱ्यांना बढतीची उत्सुकता लागते. दरम्यान, सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भात माहितीसह आक्षेप मागविले होते. एकही आक्षेप न आल्याने मार्ग सुकर झाला असून साेमवारी पदोन्नती समितीची बैठक होणार आहे. त्यामुळे बढतीच्या प्रतिक्षेत असलेल्यांची उत्कंठा वाढली आहे.
शासनाच्या निर्देशानुसार दरवर्षी सप्टेंबरमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती अंतर्गतच्या गट ड आणि क मधील कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यासाठीची प्रक्रिया राबविण्यात येते. गट ड मधील क मध्ये तर क मधील कर्मचाऱ्यांना त्याच गटात वरिष्ठ पदावर बढती दिली जाते. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाने ३० सप्टेंबरपर्यंत रिक्त होणाऱ्या पदांची संख्या प्रत्येक विभागाकडून मागवून घेतली. त्यानुसार सेवाज्येष्ठतेनुसार पात्र कर्मचाऱ्यांची यादी तयार करुन त्यावर आक्षेप मागविले. त्यामुळे यादीत नावे असलेल्या कर्मचाऱ्यांना उत्सुकता लागली आहे.
१८६ जणांना मिळणार बढती...
जिल्हा परिषद, पंचायत समिती अंतर्गतच्या १८ संवर्गातील १८६ पात्र कर्मचाऱ्यांना बढती मिळणार आहे. त्यात सहाय्यक प्रशासन अधिकारी, कनिष्ठ प्रशासन अधिकारी, वरिष्ठ सहाय्यक, विस्तार अधिकारी कृषी, पशुधन पर्यवेक्षक, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी, वृणोपचारक, विस्तार अधिकारी, मुख्याध्यापक, आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सहाय्यक, ग्रामविकास अधिकारी या पदांचा समावेश आहे.
सीईओंच्या उपस्थितीत प्रस्ताव तपासणी...
पदोन्नती समितीची बैठक सोमवारी होणार आहे. त्यात मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी आप्पासाहेब चाटे, समाजकल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन दाताळ तसेच त्या- त्या विभागाच्या प्रमुखांची उपस्थिती असणार आहे. या बैठकीत चेकलिस्टनुसार प्रस्तावांची तपासणी करुन पात्र कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिली जाणार आहे.
ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात आदेश...
सोमवारी १८६ कर्मचाऱ्यांना बढती देण्यात येणार असली तरी त्याचे आदेश ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात देण्यात येणार आहेत. समुपदेशन पध्दतीने ही निवड प्रक्रिया पार पडणार आहे. वास्तविक ही प्रक्रिया सप्टेंबरअखेरपर्यंत पूर्ण करणे अपेक्षित आहे. मात्र, जिल्हा परिषदेने तत्पूर्वीच सर्व तयारी केली आहे.
- नितीन दाताळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन.