रेशनसाठी आधार लिंकिंगची महिनाअखेर डेडलाइन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:16 AM2021-01-09T04:16:18+5:302021-01-09T04:16:18+5:30
सार्वजनिक वितरण व्यवस्थेत अधिक पारदर्शकता येण्यासाठी जिल्ह्यात मोहीम राबवून लाभार्थ्यांचे आधार व मोबाईल सीडिंग करणे आवश्यक आहे. त्यासाठी स्वस्त ...
सार्वजनिक वितरण व्यवस्थेत अधिक पारदर्शकता येण्यासाठी जिल्ह्यात मोहीम राबवून लाभार्थ्यांचे आधार व मोबाईल सीडिंग करणे आवश्यक आहे. त्यासाठी स्वस्त धान्य दुकानांतील ई-पॉस उपकरणांमधील ईकेवायएसद्वारे आधारसीडिंग व मोबाइल सीडिंग सुविधेचा वापर करून आधार व मोबाइल क्रमांक सीडिंगचे प्रमाण वाढविण्यात येत आहे. ३१ जानेवारीपर्यंत लाभार्थ्यांचे नाव शंभर टक्के आधार सीडिंग व केवळ एक मोबाइल क्रमांक लिंकिंग करण्यासाठी जिल्ह्यात मोहीम राबविण्यात येणार आहे. जानेवारीच्या धान्याचे वाटप करतेवेळी ई-पॉस उपकरणाद्वारे स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत कुटुंबातील सदस्याचा आधार सीड नसल्यास, अशा सदस्याचा आधार व मोबाइल क्रमांकाचे लाभार्थ्यांनी आपल्या नजीकच्या स्वस्त धान्य दुकानाच्या ठिकाणी जाऊन सीडिंग पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
३१ जानेवारीपर्यंत आधार सीडिंग न झालेल्या लाभार्थ्यांचे अनुज्ञेय धान्य पुढील महिन्यापासून आधार सीडिंग होईपर्यंत निलंबित होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. सदर बाब म्हणून लाभार्थी अन्नधान्यापासून वंचित राहू नये, यासाठी आधार, मोबाइल लिंकिंग करून घेण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी सदाशिव पडदुणे यांनी केले आहे.
धान्य न उचलणाऱ्या शिधापत्रिकांचे निलंबन
ज्या शिधापत्रिकांवर मागील सलग ३ महिन्यांत धान्य उचलण्यात आले नाही, अशा सर्व शिधापत्रिका तात्पुरत्या निलंबित करण्यात येतील किंवा धान्य अनुदान नसलेल्या योजनेत वर्ग करण्यात येणार आहे. धान्य उचलण्यात न आलेल्या सर्व शिधापत्रिका जानेवारीनंतर कायमस्वरूपी निलंबित करण्यात येतील. त्यामुळे आधार व मोबाइल क्रमांक सीडिंग पूर्ण करण्याची कार्यवाही लाभार्थ्यांनी तात्काळ पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी केले आहे.