ऊर्जा प्रबंधन प्रशिक्षण कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:18 AM2020-12-24T04:18:47+5:302020-12-24T04:18:47+5:30
श्री गुरुजी आयटीआयमध्ये निरोप समारंभ लातूर - शहरातील श्री गुरुजी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत निरोप समारंभ पार पाडला. यावेळी वेल्डर ...
श्री गुरुजी आयटीआयमध्ये निरोप समारंभ
लातूर - शहरातील श्री गुरुजी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत निरोप समारंभ पार पाडला. यावेळी वेल्डर बॅचच्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास संस्थाध्यक्ष अतुल ठोंबरे, प्राचार्य व्ही.के. गाडेकर, शिक्षक देशमुख, तुषार शिंदे यांची उपस्थिती होती. आत्मनिर्भर भारत संकल्पनेमुळे आयटीआयच्या विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल आहे. त्यांना तात्काळ नोकरीच्या संधी उपलब्ध होतील, असेही संस्थाध्यक्ष अतुल ठोंबरे म्हणाले.
विद्युत रोहित्र दुरुस्तीची मागणी
लातूर - सध्या रबी हंगामाच्या पिकांना पाणी देण्याचे काम सुरू आहे. मात्र अनेक ठिकाणी रोहित्र नादुरुस्त झाल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. खरीप हंगामात परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे रबी हंगामातील उत्पादनातून शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. मात्र विजेचा पुरवठा वारंवार खंडित होतो. तसेच रोहित्र नादुरुस्त होते. त्यामुळे शेतकऱ्यांना महावितरणने सहकार्य करण्याची मागणी होत आहे.
नंदकुमार बालमुरे यांचे यश
लातूर - येथील अभिनव अध्यापक महाविद्यालय अभ्यास केंद्रातील प्रशिक्षणार्थी प्रा. नंदकुमार बालमुरे यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिकच्या वतीने घेण्यात आलेल्या एम.ए. शिक्षणशास्त्र अंतिम सत्राच्या परीक्षेत यश मिळविले आहे. या यशाबद्दल प्राचार्य सुधाकर कुलकर्णी, प्रा. प्रदीप करंजीकर, प्रा.डॉ. गोपाळ पवार, प्रा. सुधीर भूमकर, प्रा.डॉ. जीवन जाधव, यु.एस.चवंडके, ग्रंथपाल सर्वेात्तम मांदळे आदींनी कौतुक केले आहे.
प्राचार्य डॉ. विजयेंद्र स्वामी पुरस्काराने सन्मानित
लातूर - येथील चन्नबसवेश्वर फार्मसी महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. विजयेंद्र स्वामी यांना १३ व्या राष्ट्रीय शिक्षण गौरव पुरस्कार समारंभात प्रिन्सिपल ऑफ द ईअर २०२० या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याबद्दल चन्नबसवेश्वर महाविद्यालयात त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भीमाशंकर देवणीकर, विजयकुमार मठपती, अरुणअप्पा हलकुडे, डॉ. संजय थोंटे आदींसह प्राध्यापक, कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
२६ डिसेंबर रोजी युवा महोत्सव
लातूर - जिल्हास्तरीय युवा महोत्सावाचे २६ डिसेंबर रोजी ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये विजेत्या स्पर्धकांना विभागीय युवा महोत्सावामध्ये सहभागी होता येणार आहे. एकांकिका, शास्त्रीय गायन, बासरी, तबला, वीणा, लोकनृत्य, लोकगीत आदी प्रकारांत या स्पर्धा होणार आहेत, अशी माहिती जिल्हा क्रीडाधिकारी महादेव कसगावडे यांनी दिली.
जोडजवळा परिसरात ऊस लागवड
लातूर - तालुक्यातील जोडजवळा, आखरवाई, ढोकी, जेवळी, गाधवड, बोरगाव काळे, निवळी, ढाकणी, महापूर, महमदापूर, सिकंदरपूर, बाभळगाव, बोरी, भातांगळी, मुशिराबाद आदी गावांत ऊस लागवडीला शेतकरी पसंती देत आहेत. यंदा समाधानकारक पाऊस झाला असल्याने जलस्त्रोतांना मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकरी ठिबक सिंचनाचा पर्याय स्वीकारत ऊस लागवडीला प्राधान्य देत आहेत.