लातूरला स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करा; विद्यापीठ निर्माण कृती समितीचे निदर्शने
By आशपाक पठाण | Published: July 8, 2024 05:22 PM2024-07-08T17:22:47+5:302024-07-08T17:24:08+5:30
जोपर्यंत विद्यापीठ स्थापना होत नाही, तोपर्यंत आंदोलन चालूच ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
लातूर : जिल्ह्यातील महाविद्यालये, विद्यार्थी संख्या लक्षात घेता स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करणे शक्य आहे. मात्र, राज्य सरकार यावर दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत आम्ही लातूरकर विद्यापीठ निर्माण कृती समितीच्या वतीने सोमवारी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गांधी चौकात निदर्शने केली.
कृती समितीच्या वतीने वारंवार आंदोलन, निवेदन, डाक विभागामार्फत मुख्यमंत्र्यांना पत्रही पाठविले. जोपर्यंत विद्यापीठ स्थापना होत नाही, तोपर्यंत आंदोलन चालूच ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. लोकनेते विलासराव देशमुख यांच्या प्रयत्नातून २००७ मध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अंतर्गत लातूरला उपकेंद्र सुरू झाले. जिल्ह्यात कला, वाणिज्य, विज्ञान, औषधनिर्माणशास्त्र, विधि, अभियांत्रिकी, वैद्यकीय अनुदानित ३६ महाविद्यालय, तर कायम विनाअनुदानित ८२ असे जवळपास एकूण ११८ महाविद्यालये आहेत. याठिकाणी तब्बल ५५ हजार ४१० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. लातूरच्या शैक्षणिक, प्रशासकीय कामाचे स्वरूप लक्षात घेता विद्यार्थी, पालक, कर्मचाऱ्यांना नांदेडला जावे लागते. शेजारच्या सोलापूर जिल्ह्यात महाविद्यालयाची संख्या १०९ असताना २०१४ मध्ये स्वतंत्र विद्यापीठ देण्यात आले. त्याच धर्तीवर लातूरला स्वतंत्र विद्यापीठ स्थापना करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.
यावेळी समन्वयक बालाजी पिंपळे, सिनेट सदस्य धनराज जोशी, ताहेरभाई सौदागर, प्रा शिरीषकुमार शेरखाने, जम्मालोद्दीन मणियार, अजयसिंग राठोड, फिरोज तांबोळी, दिगबर कांबळे, महेन्द्र गायकवाड, आकाश कांबळे, लहू जाधव खरोळे, किरण कांबळे, अतिश नवगिरे, ॲड. परमेश्वर इंगळे, स्वामी रत्नेश्वर, यशपाल ढोरमारे, श्रीकांत गंगणे, दिनेश डोईजड, राजू बुये, शंकर काळे, विकास माने, बिपिन चौहाण, वैशाली महालींगे, राहुल पवार, मंगेश डोबाळे, अमर पाचांगे, संतोष जाधव आदींची उपस्थिती होती.
निकषाची पुर्तता, तरी चालढकल...
लातूर जिल्ह्यातील महाविद्यालयांची संख्या, विद्यार्थी संख्या लक्षात घेता स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करणे गरजेचे आहे. आम्ही लातूरकर विद्यापीठ निर्माण कृती समितीच्या वतीने लोकप्रतिनिधी ते राज्यपाल, मुख्यमंत्री यांना निवेदने देण्यात आले. धरणे, स्वाक्षरी मोहीम , पोस्ट कार्ड मोहिम, महात्मा गांधी चौक लातूर येथे सलग चार दिवस उपोषण करून मागणी लावून धरली आहे. जोपर्यंत स्वतंत्र विद्यापीठ होणार नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे मुख्य संयोजक ॲड. प्रदीपसिंह गंगणे यांनी सांगितले.