बाष्पीभवन वाढले; रेणा प्रकल्पात केवळ ३.४० टक्के पाणीसाठा !

By संदीप शिंदे | Published: May 17, 2024 04:45 PM2024-05-17T16:45:05+5:302024-05-17T16:46:34+5:30

पाणीटंचाईच्या झळा तीव्र, पाणी काटकसरीने वापर करणे गरजेचे

Evaporation increased; Only 3.40 percent water storage in Rena project! | बाष्पीभवन वाढले; रेणा प्रकल्पात केवळ ३.४० टक्के पाणीसाठा !

बाष्पीभवन वाढले; रेणा प्रकल्पात केवळ ३.४० टक्के पाणीसाठा !

रेणापूर (लातूर) : अर्ध्या रेणापूर तालुक्याची तहान भागविणाऱ्या रेणा मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या तापमानामुळे झपाट्याने कमी होत आहे. रेणा मध्यम प्रकल्पातील पाण्याचे बाष्पीभवन झाल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. सद्य:स्थितीत या धरणात केवळ ३.४० टक्के पाणीसाठा शिल्लक असल्यामुळे रेणापूर तालुक्याला पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहे.

गतवर्षीपेक्षा यावर्षी रेणापूर तालुक्यामध्ये कमी पाऊस पडला. त्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने रेणापूर तालुक्यातील अर्ध्या गावांना रेणा प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, दिवसेंदिवस वाढणाऱ्या उन्हामुळे झपाट्याने होत असलेल्या पाण्याच्या बाष्पीभवनामुळे धरणातील पाणी झपाट्याने कमी झाले आहे. तसेच घनसरगाव, रेणापूर, खरोळा, हे बॅरेज सध्या कोरडेठाक पडले आहेत. त्यामुळे तालुक्यातील अनेक गावांतून सिंचन विहीर व बोअर अधिग्रहणाचे तसेच काही ठिकाणी टँकरचे प्रस्ताव आले आहेत. धरणातील शिल्लक असलेले पाणी हे पिण्यासाठी आरक्षित करण्यात आले आहे. दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत असल्यामुळे दररोज १० ते ११ एमएमने धरणातील पाण्याचे बाष्पीभवन होत आहे.

प्रकल्पावर विविध गावांच्या नळ योजना अवलंबून असून, रेणापूर तालुक्यात रेणा मध्यम प्रकल्प आणि व्हटी हे दोनच मोठे प्रकल्प आहेत. या प्रकल्पावर रेणापूर दहाखेडी, पानगाव बाराखडी, कामखेडा पाच खेडी, खरोळा, तसेच बीड जिल्ह्यातील पट्टीवडगाव यासह ३४ गावांच्या योजना अवलंबून आहेत. रेणा मध्यम प्रकल्पात सध्या ३.४० टक्केच जलसाठा उपलब्ध आहे. दिवसेंदिवस बाष्पीभवन झपाट्याने होत असल्याने नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करणे गरजेचे असल्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.

प्रकल्पातून गाळ काढण्याचे काम सुरू...
रेणापूर मध्यम प्रकल्प सद्य:स्थितीत ३.४० टक्के पाणी आहे. पाणी कमी झालेल्या क्षेत्रावरील गाळ काढण्याचे काम मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या मदतीने केला जात आहे. त्यास शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. रेणा मध्यम प्रकल्पातील पाणी एक महिना पुरेल अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या प्रकल्पावर अवलंबून असलेल्या गावातील नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन आहे.

प्रकल्पात १.१४ दलघमी मृत पाणीसाठा...
रेणापूर मध्यम प्रकल्पात सद्यस्थिती उपयुक्त पाणीसाठा ०.६९८ दलघमी, मृत पाणीसाठा १.१३ दलघमी एकूण पाणीसाठा १.८२८ दलघमी तर सरासरी ३.४० पाण्याची टक्केवारी आहे. या प्रकल्पावर अवलंबून असलेल्या गावातील नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा असे आवाहन रेना प्रकल्पाचे शाखा अभियंता श्रीनाथ कुलकर्णी यांनी केले. पुढील महिनाभरात पाऊस सुरु होणार असल्याने तोपर्यंत प्रकल्पातील पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागणार आहे.

दररोज १० ते ११ एमएमएने बाष्पीभवन...
रेणापूर तालुक्यातील घनसरगाव, रेणापूर, खरोळा, हे बॅरेज सध्या कोरडेठाक पडले आहेत. त्यामुळे तालुक्यातील अनेक गावांतून सिंचन विहीर व बोअर अधिग्रहणाचे तसेच काही ठिकाणी टँकरचे प्रस्ताव पंचायत समितीकडे आले आहेत. त्यातील काही गावांत अधिग्रहण तर एका गावांत टँकरने पाणीपूरवठा होत आहे. धरणातील शिल्लक असलेले पाणी हे पिण्यासाठी आरक्षित करण्यात आले आहे. दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत असल्यामुळे दररोज १० ते ११ एमएमने धरणातील पाण्याचे बाष्पीभवन होत आहे.

Web Title: Evaporation increased; Only 3.40 percent water storage in Rena project!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.