दळणासाठी शेजारच्या गावात जावे लागते; दोनदा आंदोलन करुनही वीजपुरवठा सुरळीत होईना
By हरी मोकाशे | Published: September 14, 2022 05:39 PM2022-09-14T17:39:35+5:302022-09-14T17:40:33+5:30
औसा तालुक्यातील उजनी हे मोठ्या बाजारपेठेचे गाव आहे, उजनीच्या नागरिकांत संताप
उजनी (जि. लातूर) : औसा- तुळजापूर महामार्गावरील उजनी येथे काही महिन्यांपासून सातत्याने वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी दोनदा १३२ केव्ही उपकेंद्रावर मोर्चा काढून आंदोलन केले. तेव्हा अभियंत्यांनी सुरळीत वीजपुरवठा केला जाईल, असे आश्वासन दिले. परंतु, पुन्हा सातत्याने वीज गुल होत आहे. त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.
औसा तालुक्यातील उजनी हे मोठ्या बाजारपेठेचे गाव आहे. विशेष म्हणजे, औसा- तुळजापूर महामार्गावर हे गाव असून जिल्ह्याच्या सीमेवर आहे. गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे नागरिकांना विविध अडचणींना सामाेरे जावे लागत आहे. त्याचा दुकानदार, व्यवसायिकांवर परिणाम होत आहे. विशेष म्हणजे, दळण दळण्यासाठी गावातील नागरिकांना शेजारील गावात जावे लागत आहे.
गावात गेल्या चार ते पाच महिन्यांपासून वीजपुरवठा सुरळीत होत नाही. त्याची वारंवार माहिती देऊनही महावितरणच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. दररोज गावातील कुठल्या तरी एका भागात अंधार असतो. गावातील व राधानगरातील प्रत्येक डीपीवरचा ट्रान्स्फमर बंद असतो. तसेच गावातील विद्युत वाहिण्या जीर्ण झाल्या आहेत. तसेच त्या रात्री- अपरात्री तुटून लोंबकाळत असतात. त्यामुळे धोक्याची भीती नाकारता येत नाही. गावास वीजपुरवठा सुरळीत करण्यात यावा, म्हणून गावकऱ्यांना दोनदा १३२ केव्ही उपकेंद्रावर मोर्चा काढून आंदोलन केले. तेव्हा तात्पुरत्या स्वरुपात वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. मात्र, पुन्हा सातत्याने बिघाड होत आहे. विशेष म्हणजे, येथील शाखा अभियंता पद काही महिन्यांपासून रिक्त आहे. त्यामुळे समस्या मांडाव्यात कुणापुढे असा सवाल उपस्थित होत आहे.
ट्रान्स्फार्मर बसविण्याची मागणी...
गावात वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी तात्काळ विद्युत ट्रान्स्फार्मर बदलण्यात यावे. तसेच गावातील जीर्ण झालेल्या विद्युत वाहिन्या बदलून नवीन टाकाव्यात. रिक्त असलेले शाखा अभियंता पद तात्काळ भरण्यात यावे, अशी मागणी सरपंच युवराज गायकवाड यांनी केली आहे. यासंदर्भात औश्याचे शाखा अभियंता गणेश जाधव म्हणाले, वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी दुरुस्तीेच आवश्यक ते साहित्य देण्यात आले आहे. लवकरच काम होईल. उजनीत शाखा अभियंत्यांची नियुक्ती ही प्रशासकीय बाब आहे, असे सांगितले.