शेजाऱ्याकडून वीज घेतली तरी दाखल हाेऊ शकताे चाेरीचा गुन्हा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:24 AM2021-09-05T04:24:43+5:302021-09-05T04:24:43+5:30
लातूर : एखाद्याकडे वीजमीटर नसेल, तर अशावेळी शेजाऱ्यांकडून वीज घेतली जाते. यातून माेठ्या प्रमाणावर वीजचाेरी हाेण्याचा धाेका असताे. अशावेळी ...
लातूर : एखाद्याकडे वीजमीटर नसेल, तर अशावेळी शेजाऱ्यांकडून वीज घेतली जाते. यातून माेठ्या प्रमाणावर वीजचाेरी हाेण्याचा धाेका असताे. अशावेळी महावितरणच्या धाडसत्रात घरमालकासह शेजाऱ्यांकडून वीज घेणाऱ्यांविराेधातही चाेरीचा गुन्हा दाखल केला जाण्याची अधिक शक्यता आहे. लातूर परिमंडळातील लातूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातील बीड, अंबाजाेगाई, उस्मानाबाद, तुळजापूर, लातूर, निलंगा आणि उदगीर उपविभागात गत वर्षभरात महावितरणच्या पथकाने या वीजचाेरांना ‘शाॅक’ दिला आहे. याबाबत दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. या माध्यमातून लाखाे रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला आहे. महावितरणच्यावतीने वर्षभर वीजचाेरीविराेधात विशेष माेहीम हाती घेण्यात आली आहे.
कायदा काय सांगताे...
वीजचाेरी करणाऱ्याविराेधात अनेकदा गुन्हे दाखल करण्यात येतात. विद्युत कायदा २००३मधील कलम १२६नुसार कारवाई करण्याची तरतूद आहे. महावितरणच्या लातूर परिमंडळात विशेष पथकाच्यावतीने वीजचाेरी राेखण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. वीजचाेरीप्रकरणी वर्षभर कारवाईचा बडगा पथकाकडून उगारण्यात आला आहे.
चाेरी कळवा... दंडातील १० टक्के रक्कम बक्षीस मिळवा...
१ ग्रामीण भागात विद्युत तारेवर आकडे टाकून वीजचाेरी करण्याचे प्रमाण माेठ्या प्रमाणावर असल्याचे पथकाने टाकलेल्या धाडीत समाेर आले आहे. चाेरी कळवा... आणि दंडातील १० हजारांची रक्कम बक्षीस म्हणून मिळवा... असे महावितरणकडून सांगण्यात आले आहे. नागरिकांनी आपल्या परिसरात हाेणारी वीजचाेरी राेखण्यासाठी पुढाकार घ्यावा, असेही आवाहन केले आहे.
२ शहरासह ग्रामीण भागात वीजचाेरीचे प्रमाण माेठे आहे. याला प्रतिबंध घालण्यासाठी महावितरणच्यावतीने विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. काही ठिकाणी शेत-शिवारातही वीज चाेरुन वापरली जात असल्याचे समाेर आले आहे. याविराेधात वर्षभर वीजचाेरी राेखण्यासाठी पथकाकडून कारवाई केली जाते.
कारवाईचा झटका...
लातूर परिमंडळातील लातूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यांतील वीजचाेरी राेखण्यासाठी महावितरणच्यावतीने विशेष माेहीम हाेती घेतली जाते. ही माेहीम वर्षभर राबवली जाते. या पथकांच्या धाडसत्रात अनेक वीजचाेरीची प्रकरणे पुढे आली आहेत. त्यांच्याविराेधात दंडात्मक गुन्हे दाखल करण्याची कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई सुुरु राहणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.