१३ व्या दिवशीही आडत बंद; नोटिशीची मुदत संपल्याने बाजार समिती कोणती भूमिका घेणार?
By हरी मोकाशे | Published: July 13, 2024 07:48 PM2024-07-13T19:48:03+5:302024-07-13T19:48:31+5:30
पेच कायम : तोडगा निघत नसल्याने शेतकऱ्यांची अडचण
लातूर : शेतकऱ्यांची अडवणूक होऊ नये म्हणून बाजार समितीने बजावलेल्या नोटिसांची मुदत संपली आहे. तरीही खरेदीदार शेतमाल खरेदीसाठी शनिवारी बाजारपेठेत उतरले नाहीत. सौदा न निघाल्याने १३ व्या दिवशीही आडत बाजार बंद राहिला. त्यामुळे आता बाजार समिती कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष लागून आहे. दरम्यान, खरेदीदार- आडत्यांच्या तिढ्यात हमाल मापाडी, शेतकऱ्यांची अडचण होत आहे.
राज्यात लौकिक असलेल्या लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीत १ जुलैपासून शेतीमालाच्या पैश्यावरुन वाद निर्माण झाला आहे. पणन कायद्यानुसार खरेदीदारांनी शेतमाल खरेदी केल्यानंतर २४ तासांत पैसे द्यावेत, अशी मागणी आडते करीत आहेत, तर पूर्वीप्रमाणे शेतमाल खरेदी केल्यानंतर नवव्या दिवशी धनादेश देण्याच्या भूमिकेवर खरेदीदार ठाम आहेत. त्यामुळे बाजार समिती १३ दिवसांपासून बंद आहे. परिणामी, आडत बाजारात शुकशुकाट असून दररोजची जवळपास १५ हजार क्विंटलची आवक थांबली आहे.
सोमवारी निर्णय होईल...
खरेदीदार व आडत्यांमधील तिढा सोडविण्यासाठी बाजार समितीने आजपर्यंत आठ बैठका घेतल्या आहेत. तसेच जिल्हा उपनिबंधक, जिल्हाधिकाऱ्यांकडेही हा प्रश्न मांडला. जिल्हा उपनिबंधकांच्या सूचनेनुसार खरेदीदारांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्याची मुदत संपली आहे. आता कोणती कारवाई करायची याबाबत सोमवारी निर्णय होईल.
- सतीश भोसले, प्रभारी सचिव.
परवाने निलंबित, रद्द करण्याच्या सूचना...
शेतकऱ्यांची अडवणूक होऊ नये म्हणून व्यापाऱ्यांना नोटिसा देण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार बाजार समितीने नोटिसा बजावल्या. त्याची मुदतही संपली आहे. शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्यांचे परवाने निलंबित अथवा रद्द करण्याच्या पुन्हा सूचना केल्या आहेत.
- संगमेश्वर बदनाळे, जिल्हा उपनिबंधक (सहकारी).