प्रतिकूल परिस्थितीतही बळीराजा हरला नाही; एक एकरात घेतले १५ क्विंटल हरभरा उत्पादन
By आशपाक पठाण | Published: February 8, 2024 01:12 PM2024-02-08T13:12:06+5:302024-02-08T13:13:26+5:30
चाकूर तालुक्यातील सुगाव येथील योगेश्वर शिंदे यांचा प्रयोग
लातूर : रब्बी हंगामातील पिकांचे बहुतांश उत्पादन निसर्गाच्या कृपेवर अवलंबून असते. त्यामुळे अनेकदा अपेक्षित उत्पादन मिळत नाही. मात्र, चाकूर तालुक्यातील सुगाव येथील योगेश्वर श्रीकृष्ण शिंदे या तरुण शेतकऱ्याने एक एकर क्षेत्रावर तब्बल १५ क्विंटल हरभऱ्याचे उत्पादन घेतले आहे. हवामानाची प्रतिकूल परिस्थिती असतानाही एकरी १५ क्विंटलचा उतारा दिलासादायक आहे.
चाकूर तालुक्यातील सुगावचे शेतकरी श्रीकृष्ण शिंदे हे प्रयोगशील शेतकरी आहेत. देशभरात विविध ठिकाणच्या कृषी संशोधन केंद्रांना भेटी देऊन नवीन वाण, उत्पन्न वाढीसाठी वेगवेगळे उपक्रम राबवितात. यावर्षी त्यांनी रब्बी हंगामात आंध्र प्रदेशातील नंदियाल येथील प्रादेशिक कृषी संशोधन केंद्रातून हरभऱ्याचे एनबीईजी ७७६ हे बियाणे आणले होते. १०५ दिवसांचे पीक असलेल्या हरभऱ्याला पेरणीनंतर एकदाही पाणी देण्याची गरज भासली नाही. पेरणीनंतर दोन वेळा पाऊस झाला. वातावरणातील बदलामुळे अळीचा प्रादुर्भावही झाला होता.
मात्र, फवारणीनंतर पिकाने जोर धरला. ऑक्टोबर महिन्यात पेरणी झालेला हरभरा कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात काढण्यात आला. पीक कापणी प्रयोग प्रात्यक्षिकात एक एकर क्षेत्रावर तब्बल १५ क्विंटलचे उत्पादन झाले आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे यंदा ५ एकरी पाच क्विंटलही उत्पादन निघेल की नाही, अशी भीती असताना शिंदे यांना भरघोस उत्पादन झाले आहे.
पीक कापणी प्रयोगात उतारा
रब्बी हंगामातील हरभऱ्याला साधारणत: दहा क्विंटलचे उत्पादन निघते. तेही हवामान चांगले असायला हवे. सुगाव येथील शेतकरी योगेश्वर श्रीकृष्ण शिंदे या शेतकऱ्याने पेरणी केलेल्या हरभऱ्याचे मंडळ कृषी अधिकारी शिरीष खंदारे यांच्या उपस्थितीत पीक कापणी प्रयोग करण्यात आला. यात एका एकरात १५ क्विंटल हरभरा निघाला आहे.