अतिवेगमर्यादा, विनाहेल्मेट प्रवास अंगलट; दोन दिवसांत २ लाख ३८ हजारांचा दंड
By आशपाक पठाण | Published: August 6, 2023 07:04 PM2023-08-06T19:04:06+5:302023-08-06T19:05:16+5:30
लातूर पोलिस 'अलर्ट मोड'मध्ये, स्पीड गनची नजर
आशपाक पठाण/ लातूर: रस्ता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हेल्मेटचा वापर अत्यंत महत्त्वाचा आहे. दुचाकी चालवीत असताना हेल्मेटचा वापर न केल्यास अपघातात जीव गमावण्याची शक्यता अधिक असते. वाहनधारकांच्या सुरक्षेसाठी प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने रस्त्यावर ओव्हरस्पीड धावणारी वाहने टिपणारी स्पीडगन आता दुचाकीवर विनाहेल्मेट प्रवास करणाऱ्यांवर नजर ठेवून आहे. दोन दिवसांत विनाहेल्मेट जाणाऱ्या २३८ जणांवर कारवाई करून २ लाख ३८ हजार दंड आकारण्यात आला आहे.
स्पीडगनच्या माध्यमातून अतिवेगाने धावणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांवर कारवाई केली जाते. एखाद्या रस्त्यावर ठरवून दिलेल्या वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांना न थांबवता स्वयंचलित यंत्राच्या माध्यमातून दंड आकारला जातो. या गनमध्ये आपण कोणत्या ठिकाणी नियमाचे उल्लंघन केले, विनाहेल्मेट कोठून प्रवास केला याची पूर्ण माहिती मिळते. एरवी स्पीडगन केवळ गती नियंत्रित राहावी, यासाठी काम करीत होते. आता मात्र, त्यात बदल झाला असून विनाहेल्मेटच्याही केसेस केल्या जात आहेत. प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने महिनाभरात ५१५ जणांवर ऑनलाइन दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे प्रमुख मार्गावरून प्रवास करीत असताना हेल्मेटचा वापर करणे आवश्यक आहे, अन्यथा दंड सहन करावा लागणार आहे.
आरटीओचे दोन पथक रस्त्यावर...
लातूरच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे दोन पथक स्पीडगनच्या माध्यमातून कारवाई मोहीम राबवीत आहेत. औसा रोडवर दोन दिवसांत तब्बल ३०० वाहनधारकांना विनाहेल्मेटचा दंड आकारण्यात आला आहे. स्पीडगनच्या समोरून अतिवेगाने जाण्याबरोबरच विनाहेल्मेट प्रवास करणेही आता महागात पडणार आहे. जुलै महिन्यात आरटीओच्या पथकाने ५१५ जणांवर दंडात्मक कारवाई केली आहे.
स्पीडगनची वक्रदृष्टी...
वेगमर्यादेचे उल्लंघन करणारी वाहने स्वयंचलित स्पीडगनमध्ये टिपली जातात. यासाठी लातूर जिल्ह्यात अंबाजोगाई, नांदेड, तुळजापूर, बार्शी रोडवर शहराच्या बाहेर स्पीडगन बसविली जातात. स्पीडगनच्या समोरून नियमांचे उल्लंघन करून जाणारी वाहने त्यात कैद होतात. विनाहेल्मेट प्रवास करणाऱ्या ५१५ वाहनधारकांना यातून दंड आकारण्यात आला असल्याचे उपप्रादेशिक विभागाकडून सांगण्यात आले.
सहा महिन्यांत १५ लाखांचा दंड...
विनाहेल्मेट दुचाकी चालविणाऱ्यास १ हजार रुपये दंडाची तरतूद आहे. त्यानुसार प्रादेशिक परिवहन विभागाच्या पथकाकडून मागील सहा महिन्यांत ५१२ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांना १५ लाख १२ हजार रुपये दंडही आकारण्यात आला आहे. स्पीडगनद्वारे आता वेगमर्यादेबरोबरच विनाहेल्मेटची कारवाई केली जात असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय भोये यांनी सांगितले.