हातभट्टी अड्ड्यांवर 'उत्पादन शुल्क'चा छापा; दारूसह ३५०० लिटर रसायन केले नष्ट
By राजकुमार जोंधळे | Published: April 25, 2023 03:20 PM2023-04-25T15:20:38+5:302023-04-25T15:20:57+5:30
यावेळी १३ गुन्हे दाखल करण्यात आले असून, दहा जणांना पथकाने अटक केली आहे.
लातूर : जिल्ह्यातील कोराळवाडी परिसरात सुरू असलेल्या हातभट्टीनिर्मिती अड्ड्यावर लातूर येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने छापा टाकला. यावेळी हातभट्टी दारूसह निर्मिती करण्यासाठी लागणारे रसायन पथकाने नष्ट केले. याबाबत पाच स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
लातूर जिल्ह्यात काही पाेलिस ठाण्यांच्या हद्दीमध्ये राजरोसपणे अवैध दारूविक्री, हातभट्टी, विक्रीसह इतर बेकायदेशीर व्यवसाय सुरू आहेत. या हातभट्टी अड्ड्याची माहिती लातूर येथील उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला मिळाली. कोराळवाडी, कासार शिरसी (ता. निलंगा), काटगाव तांडा, वसंतनगर तांडा परिसरात बिनधास्तपणे हातभट्टीची निर्मिती, विक्री केली जात होती. या ठिकाणी उदगीर आणि लातूर येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने संयुक्तपणे २१ ते २३ एप्रिल या कालावधीत छापा टाकला. यावेळी १३ गुन्हे दाखल करण्यात आले असून, दहा जणांना पथकाने अटक केली आहे. त्यामध्ये १ हजार लिटर रसायन, २९५ लिटर हातभट्टी, ३८ लिटर देशी दारू, ३ लिटर विदेशी दारू, असा एकूण ५७ हजार ४६० रुपयांचा मुद्देमाल पथकाने जप्त केला आहे.
१३ गुन्ह्यांमध्ये केली दहा जणांना अटक...
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने २१ ते २३ एप्रिल या कालावधीत ठिकठिकाणी टाकलेल्या छापा सत्रात १० जणांना अटक केली आहे. त्यांच्या विराेधात १३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे धाडसत्र पुढेही सुरूच राहणार असल्याचे सांगण्यात आले.
कोराळवाडीतील अड्ड्यावर रविवारी टाकला छापा...
कोराळवाडीची कारवाई निरीक्षक आर. एम. बांगर, आर. एम. चाटे, टी. एस. कदम, दुय्यम निरीक्षक एल. बी. माटेकर, ए. के. शिंदे, एस. पी. काळे, ए. बी. जाधव, ए. आर. घोरपडे, पी. जी. कदम, सहायक दुय्यम निरीक्षक गणेश गोले, अनंत कारभारी, ए. ए. देशपांडे, एस. जी. काळे, एस. ए. साळुंके, जी. आर. पवार, एस. व्ही. केंद्रे, देशमुख, कलवले, गवंडी, निरलेकर, पी. आर. खडके यांनी केली.