लातुरात अपहाराचा आणखी एक गुन्हा; कलेक्टरची बनावट स्वाक्षरी, शिक्के वापरत ३५ लाख हडपले
By राजकुमार जोंधळे | Published: February 6, 2023 06:16 PM2023-02-06T18:16:13+5:302023-02-06T18:16:44+5:30
लातुरात खळबळ,२६ कोटींच्या गुन्ह्यातील आरोपींचा आणखी एक कारनामा
लातूर : जिल्हाधिकारी कार्यालयातील लिपिकाने शासकीय निधीचा केलेल्या अपहाराचा आकडा आता दिवसेंदिवस वाढत आहे. २६ ऑक्टाेंबर २०१५ ते ११ फेब्रुवारी २०१६ या काळात तब्बल ३५ लाखांचा अपहार केल्याचा आणखी एक गुन्हा उघड झाला आहे. याबाबत एमआयडीसी पाेलिस ठाण्यात चार जणांविराेधात गुन्हा दाखल केला असून, यामध्ये पूर्वीच्या २६ काेटींच्या अपहार प्रकरणातील दाेघांचा समावेश आहे.
पाेलिसांनी सांगितले, महेश मुकुंदराव परंडेकर (वय ४७, रा. बार्शी राेड, लातूर) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत असलेला लिपिक मनाेज नागनाथ फुलेबाेयणे (रा. बाेरी, ता. लातूर), धाेंडाेपंत शेषेराव बिराजदार, ऋषीनाथ ए आणि सुधीर रामराव देवकते यांनी संगनमत केले. लातूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात लेखा विभाग शाखा लातूर लेखा - १ या संकलनाचा लिपिक सहायक या पदाचा पदभार असताना मनाेज फुलेबाेयणे याने तत्कालीन जिल्हाधिकारी कार्यालयात डाॅ. बिपीन शर्मा यांच्याकडे पदभार नसलेल्या कालावधीत २६ ऑक्टाेंबर २०१५ ते १२ फेब्रुवारी २०१६ या काळात स्वत: तत्कालीन जिल्हाधिकारी डाॅ. बिपीन शर्मा यांच्या स्वाक्षरी अप्रमाणितपणे व बनावटरीत्या केली.
शिक्क्यांचा गैरवापर करून बनावट धनादेशाद्वारे आरटीजीएस/ एनईएफटीच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालय लातूर यांच्या स्टेट बॅक ऑफ इंडिया येथील बॅक खात्यातून धाेंडाेपंत शेषेराव बिराजदार आणि सुधीर देवकते यांच्या नावे वेगवेगळ्या तारखांमध्ये एकत्रित सर्व ३५ लाख रुपये वर्ग केले. या शासकीय रकमेचा अपहार करून शासनाची फसवणूक केली. यापूर्वी एमआयडीसी पाेलिस ठाण्यात जवळपास २३ काेटी रुपयांच्या अपहार प्रकरणी गुन्हा नाेंद आहे. आता अपहाराचा हा दुसरा गुन्हा उघड झाला आहे. याबाबत एमआयडीसी पाेलिस ठाण्यात मनाेज नागनाथ फुलेबाेयणे, धाेंडाेपंत शेषेराव बिराजदार, ऋषीनाथ ए आणि सुधीर रामराव देवकते यांच्या विराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पाेलिस उपनिरीक्षक लाेखंडे करत आहेत.