लातूर, अहमदपूर येथील ढाब्यावर 'एक्साईज'च्या धाडी; अवैध दारुप्रकरणी ५९ जण ताब्यात
By राजकुमार जोंधळे | Published: December 29, 2022 07:26 PM2022-12-29T19:26:00+5:302022-12-29T19:27:52+5:30
लातूर शहरासह जिल्ह्यातील विविध ठिकाणी असलेल्या काही हॉटेल्स आणि ढाब्यावर मोठया प्रमाणावर बेकायदा, चोरट्या मार्गाने दारुची वाहतूक करुन ती विक्री केली जात आहे.
लातूर : शहरालगत असलेल्या ढाब्यासह अहमदपूर येथी ढाबा आणि हॉटेल्सवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने बुधवारी मध्यरात्री धाडी मारल्या. यावेळी ढाबा चलकासह एकूण ५९ जणांना अवैध दारु प्रकरणी ताब्यात घेण्यात आले आहे.
लातूर शहरासह जिल्ह्यातील विविध ठिकाणी असलेल्या काही हॉटेल्स आणि ढाब्यावर मोठया प्रमाणावर बेकायदा, चोरट्या मार्गाने दारुची वाहतूक करुन ती विक्री केली जात आहे. याबाबतची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला खबऱ्याने दिली. या माहितीच्या आधारे लातूर येथील खंडेराया ढाबा, स्वर्ग ढाब्यावर त्याचबरोबर अहमदपूर येथील न्यू तात्या लंच होम आणि साई लंच होम येथे पथकाने बुधवारी मध्यरात्री धाड मारली. यावेळी विनापरवाना, बेकायदा आणि अवैध दारु विक्री प्रकरणी ढाबा चालक, मालकासह एकूण ५९ जणांना ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी एकूण चार स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ही कारवाई अधीक्षक केशव राऊत, निरीक्षक आर. एम. बांगर, लीलाधर पाटील, तानाजी कदम,आर. एम. चाटे, एल. बी. माटेकर, अमोल शिंदे, स्वप्नील काळे, ए. बी. जाधव, सहायक दुय्यय निरीक्षक गणेश गोले, अनंत कारभारी, जवान अनिरुद्ध देशपांडे, सुरेश काळे, श्रीकांत साळुंके, ज्योतीराम पवार, हणमंत मुंडे, संतोष केंद्रे, एकनाथ फडणीस यांच्या पथकाने केली आहे.