प्रयोगशील शेतीने दुहेरी फायदा; सीताफळ बागेतून लाखोंचे उत्पन्न, तर आंतरपिक ठरले बोनस
By संदीप शिंदे | Published: November 28, 2023 06:52 PM2023-11-28T18:52:37+5:302023-11-28T18:53:06+5:30
कमी खर्चात मिळविले अधिकचे उत्पन्न; सिताफळाच्या विक्रीतून शेतकऱ्याने साधली आर्थिक प्रगती !
रेणापूर : तालुक्यातील खानापूर शिवारात माधव इगे या शेतकऱ्याने खरबड रानावर सीताफळ लागवड करून शेतकऱ्यांसाठी नवा आदर्श उभा केला आहे. बांधावरील सीताफळाची व्यावसायिक रूपाने लागवड करून अत्यंत कमी खर्चात उत्पादन काढत चांगला नफा मिळविला आहे. सध्याच्या दोन तोड्यात १४०० किलो शेतमाल हैद्राबाद येथील बाजारपेठेत पाठवला असून, त्याला प्रति किलो १४५ रुपये भाव मिळत आहे.
पारंपरिक पिकांबरोबर फळशेतीला इगे यांनी अधिक महत्त्व दिलेले आहे. तीन एकर क्षेत्रावर गोल्डन या सीताफळाच्या वाणाची लागवड केली आहे. त्यासाठी ठिंबकचा वापर केला असून, तीन वर्षात एकरी ४० हजार रुपयांचा खर्च केला. इतर पिकांच्या तुलनेत खत, औषधी व मजुरी कमी लागत असल्याने त्यांचा खर्च वाचला. इगे यांनी सीताफळातून प्रगतीची वाट धरली असून, सध्या सीताफळाची काढणी सुरू आहे. पहिल्याच दोन तोड्यात दोन लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. त्यांचा हा यशस्वी प्रयोग इतर फळबाग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आदर्श ठरत आहे. सध्या प्रतिकिलोला १४५ रुपयांचा दर मिळत आहे. पहिल्याच दोन तोड्यात १४०० किलो उत्पादन घेतले आहे. अजूनही सुमारे ४ ते ५ टन उत्पादन मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे साधारण साडेसहा टन उत्पादन निघाल्यास ७ ते ९ लाख रुपयांचे उत्पन्न मिळून खर्च वगळता ७ लाख रुपयांचा निव्वळ नफा होणे अपेक्षित आहे.
सिताफळामध्ये खरीप, रबीची घेतली पिके...
लागवड केलेली जमीन हे मध्यम स्वरूपाची खरबड आहे. या जमिनीवर लागवड केलेल्या तीन एकर सिताफळाला ठिंबकद्वारे पाणीपुरवठा करून कमी पाण्यावर व कमी खर्चात जास्त उत्पादन घेण्याचा प्रयत्न यातून केला आहे. तीन वर्षांपूर्वी लागवड केलेल्या सिताफळाबरोबरच आंतरपीक म्हणून खरीप हंगामात सोयाबीन तर रब्बी हंगामात हरभरा याही पिकाचे दुहेरी उत्पन्न यातून घेतले जात आहे. खरीप हंगाम सोयाबीन पेरणी केली होती. उतारा कमी आला मात्र तरीही यातून वीस कट्टे सोयाबीनचे झाले असल्याचे इगे म्हणाले.
खर्च सव्वा लाखांचा, उत्पन्न मिळणार ७ लाखांचे...
गट नं. ९३ मध्ये खानापुर शिवार आहे. सिताफळाची तीन वर्षाखाली लागवड केली. उत्पन्नाचे हा पहिलाच तोडा आहे. दोन तोड्यात १४०० किलो विक्री झाली आहे. एकूण ५ ते ६ हजार किलो माल निघण्याचा अंदाज आहे. आतापर्यंत फवारणी, खत व इतर खर्च असा १ लाख २० हजार खर्च आला असून, सध्या हा माल हैद्राबाद येथे विक्रीला जात आहे. तेथे १४५ किलो रुपयाप्रमाणे विक्री होत आहे. यातून खर्च जाऊन ७ लाख रुपयाचे नफा होईल असे शेतकरी माधव इगे यांनी सांगितले.