उदगीरात फेरफारमध्ये परस्पर बदल केल्याचा प्रकार उघडकीस
By संदीप शिंदे | Published: June 10, 2023 06:56 PM2023-06-10T18:56:55+5:302023-06-10T18:57:14+5:30
नगररचनाकार कार्यालयात दाखल केलेली फेरफारची नक्कल खोटी असल्याचे निदर्शास आले.
उदगीर : शहराचे उपनगर असलेल्या निडेबन तलाठी हद्दीतील जमिनीच्या फेरफारमध्ये बदल करुन बोगस फेरफार लातूर येळील नगररचनाकार कार्यालयात दाखल करुन जमिनीचे रेखांकन मंजूर करून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला असून, मंडळ अधिकाऱ्यांच्या अहवालात ही बाब समोर आली. त्यानुसार तहसीलदारांनी नगर रचनाच्या सहायक संचालकांना कायदेशीर कारवाई करण्याच्या लेखी सुचना केल्या आहेत.
मुकुंद गणपतराव सोमवंशी यांचा निडेबन हद्दीतील सर्वे क्रमांक १००/२ मधील जमिनीचा तलाठी फेरफार क्रमांक ४३०८/२०२१ आहे. मंडळ अधिकाऱ्यांकडून ३१ ऑगस्ट २०२१ रोजी नोंद प्रमाणित करण्यात आली. तलाठ्याच्या फेरफारमध्ये परस्पर बदल करून वर्ष २०२१ ऐवजी २०२० असा बदल करण्यात आला. या आधारे नगर रचना लातूर यांच्याकडे दाखल करीत रेखांकन मंजूर करून घेतले, अशी तक्रार तहसीलदारांकडे आली होती. त्याचीत्खल घेत तहसीलदार गोरे यांनी मंडळाधिकारी यांना चौकशीचे आदेश देऊन अहवाल मागविला होता.
मंडळ अधिकारी शंकर जाधव यांनी चौकशी केली असता त्यांना नगररचनाकार कार्यालयात दाखल केलेली फेरफारची नक्कल खोटी असल्याचे निदर्शास आले. याप्रकरणी लातूरचे नगर रचनाकार यांना पत्र देऊन या सर्वेनंबर मधील जागेचे चुकीचे कागदपत्रे दाखल करणाऱ्या व्यक्तींची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची सुचना केली असल्याचे तहसीलदार रामेश्वर गोरे यांनी सांगितले.