आरटीई नोंदणीसाठी ४ जूनपर्यंत मुदतवाढ; लातूर जिल्ह्यात आतापर्यंत ६८०५ विद्यार्थ्यांचे अर्ज
By संदीप शिंदे | Published: May 31, 2024 07:12 PM2024-05-31T19:12:28+5:302024-05-31T19:14:38+5:30
२१५ शाळांची शिक्षण विभागाकडे नोंदणी : राज्यस्तरावर निघणार सोडत
लातूर : आर्थिक दुर्बल घटकांतील बालकांना मोफत शिक्षण मिळावे, यासाठी आरटीई प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येत असून, जुन्याच पद्धतीने प्रवेशप्रक्रिया होत आहे. दि. ३१ मेपर्यंत अर्ज करण्याची मुदत होती. शुक्रवारी सायंकाळपर्यंत १८६५ जागांसाठी ६८०५ विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल झाले आहेत. दरम्यान विद्यार्थ्यांचा प्रतिसाद पाहता अर्ज करण्यास ४ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
आरटीई प्रवेशप्रक्रियेत नवीन नियमानुसार जिल्हा परिषद, मनपा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांचा समावेश करण्यात आला होता. त्यात इंग्रजी शाळांचा पर्याय येत नव्हता. विशेष म्हणजे नवीन नियमानुसार १७००हून अधिक शाळांनी नोंदणी केली होती. यात २२ हजार जागा भरल्या जाणार होत्या. मात्र, अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. केवळ १२०० अर्ज या प्रक्रियेसाठी दाखल झाले होते. त्यातच शिक्षण विभागाच्या नवीन निर्णयास न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे जुन्याच पद्धतीने प्रवेशप्रक्रिया राबविली जात आहे. त्यासाठी १७ मेपासून अर्जप्रक्रिया सुरू झाली आहे. दि. ३१ मेपर्यंत पालकांना आपल्या पाल्याचे अर्ज दाखल करण्याची मुदत होती. यात आता ४ जूनपर्यंत वाढ करण्यात आली आहे. शुक्रवारी सायंकाळपर्यंत ६ हजार ८०५ अर्ज आले असून, यामध्ये १४८६ अर्ज कन्फर्म झालेले नाहीत. तसेच ५३१९ अर्ज स्विकारण्यात आले आहेत. दरम्यान, आता राज्यस्तरावरुन सोडत निघणार असून त्याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.
शाळा सुरु होण्यापुर्वीच सोडत जाहीर होणार...
२०२४-२५ या शैक्षणिक वर्षांत शाळा १५ जुनपासून सुरु होणार आहेत. त्यामुळे निर्धारित वेळेत आरटीईची प्रक्रिया पार पाडण्याचे आव्हान शिक्षण विभागासमोर आहे. ३१ मे रोजी अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल अशी शक्यता होती. मात्र आता ४ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. आता त्यानंतरच अर्जाची पडताळणी करण्यात येणार आहे. पुण्यावरुन राज्यस्तरीय सोडत काढण्यात येईल. यामध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांस संदेश येणार असून, समितीकडून कागदपत्रांची पडताळणी करावी लागणार आहे. त्यानंतर प्रवेश निश्चित करावे लागणार असल्याचे उपशिक्षणाधिकारी प्रमोद पवार यांनी सांगितले.