स्वाधार योजनेचे अर्ज स्वीकारण्यासाठी मुदतवाढ; आता १६ मार्चपर्यंत करता येणार अर्ज
By हणमंत गायकवाड | Published: March 8, 2023 06:06 PM2023-03-08T18:06:44+5:302023-03-08T18:07:27+5:30
शासकीय वसतिगृहामध्ये पात्र असूनही प्रवेश न मिळाल्यामुळे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांचे मॅट्रिकेत्तर शिक्षण अपूर्ण राहू नये म्हणून महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबवली जाते.
लातूर : शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी पात्र, मात्र प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. दरम्यान, परीक्षा असल्यामुळे विद्यार्थ्यांना या योजनेत अर्ज करण्यास अडचणी येत असल्याने १६ मार्चपर्यंत अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.
शासकीय वसतिगृहामध्ये पात्र असूनही प्रवेश न मिळाल्यामुळे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांचे मॅट्रिकेत्तर शिक्षण अपूर्ण राहू नये म्हणून महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबवली जाते. या योजनेत विद्यार्थ्यांना भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा दिल्या जातात. त्याबाबतची रक्कम संबंधित विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट वितरित करण्यात येते. २९२२-२३ या शैक्षणिक वर्षातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे अर्ज १ फेब्रुवारी २०२३ ते ७ मार्च २०२३ या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने सहाय्यक आयुक्त कार्यालयाकडून स्वीकारण्यात आलेले आहेत. तथापि सद्यस्थितीत विद्यार्थ्यांचा परीक्षा कालावधी असल्याने अनेक विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेचा अर्ज भरण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे स्वाधार योजनेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. १६ मार्चपर्यंत विद्यार्थ्यांना आता या योजनेमध्ये अर्ज करता येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेचा अर्ज करता आलेला नाही, त्यांनी त्वरित ऑनलाईन अर्ज करून त्याची हार्ड कॉपी सहाय्यक आयुक्त कार्यालयात सादर करावी, असे आवाहन समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्त एस. एन. चिकुर्ते यांनी केले आहे.
पाच दिवसांत अर्ज सादर करा
विद्यार्थ्यांच्या घरापासून पाच किमी अंतराच्या पुढे शहरात महाविद्यालय आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी ही योजना आहे. आतापर्यंत ११३५ विद्यार्थ्यांनी या योजनेअंतर्गत अर्ज सादर केलेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी या योजनेत अर्ज सादर केलेला नाही, त्यांनी पुढील पाच दिवसांमध्ये ऑनलाईन अर्ज सादर करावा, असे समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्तांनी केले आहे.