लिपिकाच्या नोकरीचे आमिष दाखवून तीन लाखाला गंडा; भामटा जाळ्यात
By राजकुमार जोंधळे | Published: June 2, 2023 04:48 PM2023-06-02T16:48:59+5:302023-06-02T16:49:41+5:30
पाेलिसांची कारवाई : लातुरात एकाला उचलले...
लातूर : लिपिकाची नाेकरी देताे असे आमिष दाखवून फसवणूक करणारा भामटा लातूर पाेलिसांच्या सापळ्यात अलगद अडकला असून, पाेलिसांनी त्याला आज सकाळी अटक केली आहे. याबाबत पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे.
पाेलिसांनी सांगितले, लातुरातील दयानंद गेटनजीकच्या होस्टेलमध्ये वास्तव्य करून शिक्षण घेणाऱ्या एका ३१ वर्षीय विद्यार्थ्याने पाेलिसात धाव घेतली. लातूर पाेलिस अधीक्षक कार्यालयात लिपिक पदाच्या तीन जागा रिक्त असून, त्या ठिकाणी मी तुला नाेकरी लावताे असे आमिष दाखवत, विश्वास संपादन करून परभणी जिल्ह्यातील एकाकडून तीन लाख रुपयांची रक्कम उकळली. विशेष म्हणजे, तक्रारदार विद्यार्थी आणि फसविणारा आराेपी हे एकाच गावचे रहिवासी आहेत. याबाबत शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात गुरनं. २४०/२०२३ कलम ४२० भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
ही कारवाई पाेलिस अधीक्षक साेमय मुंडे, अपर पाेलिस अधीक्षक डाॅ. अजय देवरे, लातूर शहर उपविभागीय पाेलिस अधिकारी भागवत फुंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गजानन भातलवंडे, अंमलदार राजाभाऊ मस्के, नवनाथ हासबे, तुराब पठाण, जमीर शेख, माधव बिल्लापट्टे यांच्या पथकाने केली.
हाॅटेलात लावला पाेलिसांनी सापळा...
तक्रारदार विद्यार्थ्याला आज सकाळी आराेपी पोलिस अधीक्षक कार्यालयालगत हॉटेलात भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी हॉटेलमध्येच सापळा लावला. ठरल्याप्रमाणे आराेपी तक्रारदार विद्यार्थ्याला भेटण्यासाठी हॉटेलात आला. त्यावेळी त्याला पोलिसांनी अलगद ताब्यात घेत, अधिक चाैकशी केली. नवनाथ महादेव सावंत (वय २०, रा. कोदरी, ता. गंगाखेड, जि. परभणी) असे त्याने स्वत:चे नाव सांगितले. चाैकशीत त्याने तक्रारदार विद्यार्थ्याला नाेकरीचे आमिष दाखवत तीन लाख रुपये उकळल्याची कबुली दिली.