बंदूक, चाकूचा धाक दाखवून दोन लाखांची खंडणी वसूल; चौघांविरुध्द गुन्हा दाखल
By हरी मोकाशे | Published: March 30, 2023 05:27 PM2023-03-30T17:27:13+5:302023-03-30T17:27:24+5:30
मागील एक महिन्यापासून सुरु होता खंडणी वसूल करण्याचा प्रकार
उदगीर : शहरातील रेड्डी कॉलनीतील एका कुटुंबास चौघांनी महिनाभरापासून बंदूक व चाकूचा धाक दाखवून दोन लाखांची खंडणी वसूल केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी गुरुवारी चौघांविरुध्द खंडणीसह इतर कलमान्वये उदगीर ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ग्रामीण पोलिसांनी सांगितले, शैलेश पाटील (रा. लिंबगाव), वैभव देशमुख (रा. निडेबन), आदित्य कांबळे (रा. उदगीर) व ओमकार श्रीधर खंडागळे (रा. भेंडेगाव, ता.मुखेड, हमु. उदगीर) या चौघांनी संगणमत केले. त्यांनी फिर्यादीच्या मुलास बंदूक व चाकूचा धाक दाखवून त्याचे आई- वडील व भावास जीवे मारण्याची धमकी दिली. फिर्यादीच्या मुलाकडून वारंवार खंडणी मागून फिर्यादीच्या मुलाच्या पाटीवर, गालावर व इतर ठिकाणी लाथा- बुक्क्यांनी मारहाण केली.
तसेच फिर्यादीच्या मुलाकडून गेल्या एक महिन्यापासून ते आजपर्यंत रोख २ लाख १ हजार ४५० रूपयांची खंडणी वसूल केली. याप्रकरणी उमेश गोकुळदास झंवर (रा. रेड्डी, कॉलनी, उदगीर) यांच्या फिर्यादीवरुन वरील चौघांविरुद्ध गुरुवारी पहाटे उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात खंडणी मागणे व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक तारू हे करीत आहेत.