लातुरातून दिवाळीसाठी लांबपल्ल्याच्या मार्गावर जादा बसेसची साेय! पुणे मार्गावर १४ फेऱ्यांची वाढ
By राजकुमार जोंधळे | Published: October 17, 2022 07:38 PM2022-10-17T19:38:29+5:302022-10-17T19:40:46+5:30
पुणे शहरातील कॅन्टाेन्मेंट मैदान, खडकी येथून लातूर जिल्ह्यातील प्रवाशांसाठी दरराेज रात्री सहा बसफेऱ्यांचे नियाेजन करण्यात आले आहे.
लातूर : दिवाळीसाठी प्रवाशांच्या साेयीसाठी एसटी महामंडळाच्या वतीने जादा बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. लातूर विभागातील लातूर, उदगीर, अहमदपूर, निलंगा आणि औसा बसस्थानकातून लांबपल्ल्यांच्या मार्गावर या बसेस धावणार आहेत. यासाठी लातूर-पुणे मार्गावर १४ जादा फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने दिवाळी सणासाठी १७ ते ३१ ऑक्टाेबर या काळात जादा बसेस आणि फेऱ्यांचे नियाेजन करण्यात आले आहे. लातूर ते पुणे मार्गावर सर्वाधिक बसेस धावणार आहेत. पुणे वल्लभनगर मार्गावर लातूर, उदगीर, निलंगा, औसा आगारातून बसेस धावणार आहेत. पुणे येथून लातूर जिल्ह्यात येणाऱ्या प्रवाशांची गर्दीचा विचार करून, यावर्षी पुणे कॅन्टाेनमेंट मेदान, खडकी येथून दरराेज १९ ते २३ ऑक्टाेबर या काळात पाच दिवसासाठी सहा जादा बसेसचे नियाेजन करण्यात आले आहे. त्यासाठी संगणकीय आरक्षण उपलब्ध करून देण्यात आले आहे.
अशा आहेत फेऱ्यांच्या वेळा...
पुणे ते लातूर या मार्गावर रात्री २२ आणि २२.३० वाजता बस मार्गस्थ हाेणार आहे. पुणे येथून उदगीरच्या दिशेने रात्री २१ वाजता बस सुटणार आहे. पुणे येथून अहमदपूरसाठी रात्री २०.४५ वाजता बस मार्गस्थ हाेणार आहे. पुणे येथून निलंगासाठी रात्री २०.१५ वाजता तर पुणे येथून औशासाठी रात्री २१.३० वाजता मार्गस्थ हाेणार आहे.
कॅन्टाेनमेंट येथून सहा फेऱ्या...
पुणे शहरातील कॅन्टाेन्मेंट मैदान, खडकी येथून लातूर जिल्ह्यातील प्रवाशांसाठी दरराेज रात्री सहा बसफेऱ्यांचे नियाेजन करण्यात आले आहे. प्रवाशांचे भारमाण पाहून अधिकच्या बसेस वाढविण्याचे नियाेजन परिस्थिती पाहून घेतला जाणार आहे. सध्याला लातूर विभागातील पाच आगारांतून जादा बसेसचे नियाेजन केले आहे. त्याचबराेबर औसा येथून औरंगाबाद मार्गावर बसेसची साेय केली आहे.