काॅपीमुळे शिवणी कोतलच्या बारावी परिक्षा केंद्राच्या संचालकांची हकालपट्टी
By admin | Published: February 28, 2017 07:13 PM2017-02-28T19:13:24+5:302017-02-28T19:13:24+5:30
बारावीच्या परीक्षेत पहिल्याच दिवशी निलंगा तालुक्यातील शिवणी कोतल येथील परीक्षा केंद्रावर कॉप्या सुरू असल्याच्या तक्रारींमुळे केंद्र संचालक आर.के. झरकर
Next
>ऑनलाइन लोकमत
लातूर, दि. 28 - बारावीच्या परीक्षेत पहिल्याच दिवशी निलंगा तालुक्यातील शिवणी कोतल येथील परीक्षा केंद्रावर कॉप्या सुरू असल्याच्या तक्रारींमुळे केंद्र संचालक आर.के. झरकर यांची तडकाफडकी हकालपट्टी करून त्यांच्या जागेवर भारत सातपुते यांची नियुक्ती करण्यात आली.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावी परीक्षेचा प्रारंभ मंगळवारी झाला असून, इंग्रजी विषयाचा पहिला पेपर सुरू असताना निलंगा तालुक्यातील शिवणी कोतल येथील शामगीर उच्च माध्यमिक विद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर मोठ्या प्रमाणात नकला सुरू होत्या. या संदर्भात लातूर बोर्डाच्या सचिवांकडे दूरध्वनीवरून अनेक पालकांनी तक्रारी केल्या. या तक्रारींची दखल घेत लातूर बोर्डाचे सचिव डॉ. गणपतराव मोरे यांनी केंद्र संचालक आर.के. झरकर यांची तात्काळ हकालपट्टी करून त्यांच्या जागेवर भारत सातपुते यांची केंद्र संचालक म्हणून नियुक्ती केली आहे.
इंग्रजी विषयाचा पेपर सुरू होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना परीक्षेत येणा-या प्रश्नांची माहिती व त्याच्या कॉप्या पुरविण्यात आल्या. बहुतांश परीक्षार्थ्यांकडे परीक्षेत विचारलेल्या प्रश्नांच्या नकला असल्याची तक्रार लातूर बोर्डाच्या सचिवांकडे काही पालकांनी केली. त्यामुळे त्यांनी तात्काळ निलंगा येथील गटशिक्षणाधिका-यांना परीक्षा केंद्रावर पाठवून चौकशी करण्याचे आदेश दिले. शिवाय, तक्रारींचा ओघ पाहता केंद्र संचालक आर.के. झरकर यांची हकालपट्टी करून त्यांच्या जागेवर भारत सातपुते यांची नियुक्ती केली.
गटशिक्षणाधिकाºयांमार्फत होणार चौकशी...
निलंग्याचे गटशिक्षणाधिकारी जीवनराव फावडे यांना चौकशी करण्याचे आदेश विभागीय सचिवांनी दिले आहेत. परीक्षा सुरू होताना केंद्रावर कॉप्या आढळल्या का? बैठे पथकांनी परीक्षार्थ्यांची तपासणी केली होती का? केंद्र संचालकांनी काय खबरदारी घेतली? या अनुषंगाने चौकशी करावी व त्याचा अहवाल सादर करावा, असेही आदेश देण्यात आले आहेत. चौकशीचा अहवाल आल्यानंतर संबंधित केंद्र प्रमुखांवर निलंबनाचीही कारवाई होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.