कारखाना चाकूरातील रोहिण्यात; ड्रग्जचे मार्केट मुंबईत! आरोपीमध्ये पोलिसाचाही समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 14:26 IST2025-04-11T14:26:43+5:302025-04-11T14:26:57+5:30

एक किलोचा व्यापार यशस्वी : ११ किलोचा दुसरा डाव फसला अन् आरोपींना जेलची हवा

Factory in a shed in Rohini, Chakur; Drug market in Mumbai! 1 kg of drugs sold, accused caught selling 11 | कारखाना चाकूरातील रोहिण्यात; ड्रग्जचे मार्केट मुंबईत! आरोपीमध्ये पोलिसाचाही समावेश

कारखाना चाकूरातील रोहिण्यात; ड्रग्जचे मार्केट मुंबईत! आरोपीमध्ये पोलिसाचाही समावेश

- संदीप अंकलकोटे

चाकूर (जि. लातूर) : चाकूर तालुक्यातील रोहिणा शिवारातील पत्र्याच्या शेडचा वापर करून मुंबईच्या मार्केटमध्ये ड्रग्ज पुरविण्याचा १ किलोचा पहिला प्रयत्न यशस्वी झाल्यानंतर दुसऱ्या डावात मात्र आरोपींची विकेट पडली. केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणा आणि पोलिसांनी मुंबईस्थित आरोपींना नांदगावची जेल दाखविली.

२२ मार्च २०२५ रोजी आरोपींनी रोहिणा येथील पत्र्याच्या शेडमध्ये मिक्सिंग करण्यात आलेला अमली पदार्थ यशस्वीपणे मुंबईत पोहोचविल्याची माहिती आहे. त्यानंतर आरोपींनी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात ११ किलो ३६ ग्रॅम मिक्सिंग केलेला १७ कोटींचा अमली पदार्थ टप्प्याटप्प्याने नेण्याची तयारी केली होती. परंतु यंत्रणेने रोहिण्याचे धागेदोरे शोधले आणि कारखाना उद्ध्वस्त केला.

मीरा भाईंदरचा पोलिस रोहिण्याचा
मूळ रोहिणा येथील रहिवासी आणि मीरा भाईंदर येथे पोलिस दलात नोकरीत असलेला हवालदार आरोपी प्रमोद केंद्रे याचा आरोपींशी कसा संपर्क आला अथवा त्याचा यात नेमका किती आणि कसा सहभाग आहे, हे तपासात निष्पन्न होईल. तर उर्वरित सहाही जण मुंबई परिसरातील रहिवासी आहेत.

गावकऱ्यांना धक्का, शेडजवळ कोणी फिरकत नव्हते
रोहिणाच्या गावकऱ्यांना शेडमध्ये नेमके काय चालले आहे, कळले नाही. कोणी फिरकले तर तिथे श्वान तैनात होते. मुंबई मीरा भाईंदरमध्ये हवालदार असलेल्या प्रमोदचे गावाकडे येणे-जाणे वाढले होते. रोहिणा हे गाव चाकूरपासून १८ किलोमीटर अंतरावर असून, गावकऱ्यांना घडल्या प्रकाराचा मोठा धक्का बसला आहे. पुरातन मंदिराचे रोहिणा गाव श्रद्धाळू आणि सामाजिक कार्यात अग्रेसर असते. आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक या राज्यांतून भाविक येथे येत असतात.

३५ अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पथक
केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेच्या पथकाला संशय आल्यानंतर त्यांनी रोहिण्याकडे मोर्चा वळविला. कारवाईपूर्वी ३५ अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पथक मोहिमेत सहभागी होते. कमालीची गुप्तता बाळगून पथकाने ड्रग्ज मिक्सिंग कारखान्याची माहिती गोळा केली व धाड टाकली. यात शेडमध्ये ड्रग्ज मिक्सिंग करणाऱ्यांची राहण्याची व जेवणाची सोय करण्यात आलेली होती.

आरोपीचा निसटण्याचा प्रयत्न
८ एप्रिल रोजी आरोपी आहाद मेमन याला तपास यंत्रणेतील वरिष्ठ अधिकारी वृंदा सिंह हे जेरबंद करून नेत असताना आरोपी मेमनने पळण्याचा प्रयत्न केला. कारमध्ये गोंधळ घातला. कार उलटली. झटापटीत मेमनच्या डाव्या डोळ्याच्या वरच्या बाजूस मार लागला, तर कारमधील कर्मचारी कैलास शर्मा यांनाही खरचटले होते.

Web Title: Factory in a shed in Rohini, Chakur; Drug market in Mumbai! 1 kg of drugs sold, accused caught selling 11

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.