बनावट सोन्यातून फसवणूक करणारी अट्टल टाेळी जेरबंद
By राजकुमार जोंधळे | Published: August 27, 2022 06:47 PM2022-08-27T18:47:31+5:302022-08-27T18:48:04+5:30
चाकूर पाेलिसांचा सापळा : सहा जणांविराेधात गुन्हा
लातूर : बनावट साेने खरे असल्याचे भासवत फसवणूक करणाऱ्या सराईत टाेळीला माेठ्या शिताफिने चाकूर पाेलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून पिवळ्या धातूचे दागिने जप्त केले असून, याबाबत चाकूर ठाण्यात सहा जणांविराेधात गुन्हा दाखल केला आहे.
पाेलिसांनी सांगितले, चाकूर येथील सहायक पाेलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्याकडे एका तक्रारदाराने माहिती दिली, काही महिला आणि पुरुष कमी दरात दहा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने विकण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले. ते लोक माझी फसवणूक करतील याबद्दल मला संशय निर्माण झाला असून, खरेदी-विक्रीचा व्यवहार संध्याकाळी सहा वाजता होणार असल्याची माहिती मिळाली. दरम्यान, चाकूर येथे सहायक पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांनी चाकूर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी, अंमलदार यांच्या पथकाने सापळा लावला.
सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सोन्याची देवाणघेवाण होत असताना पोलिसांचा संशय आल्याने या टोळीतील सदस्यांनी तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, आजूबाजूला दबा धरून बसलेल्या पोलिसांनी त्यांना पकडले. त्यांची झाडाझडती घेतली असता, पिवळ्या धातूचे दागिने सापडले. अधिक चाैकशी केली असता, त्यांनी सांगितले, आम्हाला पैशांची गरज असल्याने आम्ही हे सोने कमी किमतीत विकायचाे, असे सांगत ग्राहकाला खोटे सोने विकणार होतो, अशी कबुली दिली.
टाेळीतील जया दीपक शिंदे (वय ३५), शीला तपास भोसले (३७), शुक्सला समाधान काळे (३९), राम मारुती कोकरे (२६), सूरज समाधान काळे (२१), सुनील सीताराम भोसले (६१ सर्व रा. तुळजापूर) यांच्याविराेधात चाकूर पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडील बनावट सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.