स्वयंपाक, पिण्यासाठी 'हे' कुटुंब बारमाही वापरते पावसाचेच पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 07:49 PM2019-06-05T19:49:17+5:302019-06-05T19:55:08+5:30
स्वयंपाक अन् पिण्यासाठी पावसाच्या पाण्याचा बारमाही वापर
- नरसिंह कद्रे
मुरुड (जि. लातूर) : एकीकडे उन्हाळ्यात घागरभर पाण्यासाठी भटकंती करावी लागत असताना लातूर तालुक्यातील मुरुड येथे गेल्या २० वर्षांपासून काशीराम खंडेलवाल यांनी पावसाचे पाणी साठवून त्याचा बारमाही वापर केला आहे. विशेष म्हणजे हे पावसाचे पाणी स्वयंपाक व पिण्यासाठीही ते वापरतात. त्यांचा हा अनोखा प्रयोग मुरुड व परिसरात चर्चेत आहे.
मुळचे राजस्थानमधील नागोर जिल्ह्याचे रहिवासी असलेले काशिराम खंडेलवाल हे कापड व्यवसायासाठी मुरुडला आले. २० वर्षांपूर्वी मुरुडला आलेल्या खंडेलवाल यांनी दैनंदिन वापरासाठी पावसाच्या पाण्याचा वापर सुरू केला. १४ वर्षांनंतर आजही कायम आहे. घराचे बांधकाम करतानाच त्यांनी पावसाचे पाणी साठविण्याची योजना तयार केली. त्यानुसार ५ फूट उंच, १४ फूट लांब व १० फूट खोलीचा हौद बांधला. तोही भूमिगत. या हौदात छतावर पडणारे पाणी दोन चेंबरमधून सोडले जाते. पाण्यातील कचरा हौदात जाऊ नये, यासाठी या दोन्ही चेंबरला जाळ्या बसविण्यात आल्या आहेत. पहिल्यांदा पडणाऱ्या दोन पावसाचे पाणी ते हौदात घेत नाहीत. परंतु, त्यानंतर पावसाचे पाणी हौदात घेतले जाते. एकदा हौद भरल्यानंतर त्यातील पाणी त्यांना २५ महिने पाणी पुरते.
सहा माणसांचे कुटुंब
या हौदातून पाणी काढण्यासाठी खंडेलवाल यांनी १४ वर्षांपूर्वी घेतलेल्या बकेट व दोरीचा आजही उपयोग केला जातो. सहा माणसांचे कुटुंब असलेल्या खंडेलवाल यांना स्वयंपाक व पिण्यासाठी पावसाच्या पाण्याचाच आधार आहे.
प्रवासात घरातून घेतले जाते पाणी
खंडेलवाल प्रवासाला निघाले तर प्रवासाच्या वेळेनुसार लागणारे पाणी बाटलीत भरून घेतात. त्यामुळे बाहेरचे पाणी पिण्याचा प्रसंग कधी येत नाही. दर दोन वर्षांनी हौदाची स्वच्छता केली जाते. विशेष म्हणजे पाण्यावर सूर्यप्रकाश पडणार नाही, याची काळजी घेतली जाते. राजस्थानच्या वाळवंटी प्रदेशातून आल्याने त्यांना पाणी बचतीचे फायदे चांगले माहीत आहेत.