नापिकीला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या; चाकूर येथील घटना
By हरी मोकाशे | Published: October 1, 2023 08:47 PM2023-10-01T20:47:35+5:302023-10-01T20:48:36+5:30
याप्रकरणी चाकूर पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हरी मोकाशे, लातूर : सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून देवंग्रावाडी (ता. चाकूर) येथील एका ४२ वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी घडली. याप्रकरणी चाकूर पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
बाळू सोपानराव मेकले (४२, रा. देवंग्रावाडी) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. चाकूर तालुक्यातील देवंग्रावाडी येथील शेतकरी बाळू मेकले हे शेतीवर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित होते. मात्र, सततच्या नापिकीमुळे ते नैराश्यग्रस्त झाले होते. तसेच त्यांनी एका बँकेचे कर्जही काढले होते. यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतीतून अपेक्षित उत्पन्न निघणार नसल्याने कर्ज कसे फेडायचे अशा विवंचनेत ते होते. त्यातूनच त्यांनी शेतातील चिंचेच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी मिलिंद मेखले यांच्या माहितीवरुन चाकूर पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.