बोअरवेल्सच्या गाडीखाली चिरडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू
By संदीप शिंदे | Published: March 25, 2024 06:10 PM2024-03-25T18:10:03+5:302024-03-25T18:10:20+5:30
देवणी तालुक्यातील हेळंब येथील घटना
वलांडी (जि. लातूर) : देवणी तालुक्यातील हेळंब येथे एका शेतकऱ्याने शेतात बोअर घेण्यासाठी बोअरवेल गाडी मागवली होती. शनिवारी संध्याकाळी बोअरही घेण्यात आला. बोअर घेतल्यानंतर गाडीच्या पाठीमागे पाच शेतकरी झोपले होते. पहाटेच्या सुमारास ड्रायव्हरने हयगयीने निष्काळजीपणे गाडी चालु करुन रिव्हर्स घेतल्याने गाडीखाली शेतकरी चिरडल्याची घटना घडली. याबाबत देवणी पोलीस ठाण्यात चालकाविरुद्ध गुन्हा नोंद आहे. अंगद गोपाळ साळुंखे (वय ३८ रा. हेळंब ता. देवणी) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.
पोलिसांनी सांगितले, हेळंब येथे गाडी क्रमांक जि.जे. ०३ एच.ई. ४५०४ ने हेळंब येथे बोअर घेण्यात आला. पाच शेतकरी शेतातच झोपले होते. मात्र, बोअरवेलचे वाहन शेतातून बाहेर काढताना चालकाने हयगय व निष्काळजीपणे वाहन चालवून शेतकऱ्यांच्या अंगावर वाहन घातले. त्यात अन्य चार शेतकरी उठुन पळाल्याने त्यांचा जीव वाचला. तर अंगद साळुंखे यांचा चिरडून मृत्यू झाला. याबाबत भगवान बालाजी पवार (रा. मस्की जि.नांदेड) यांच्याविरोधात वाहन निष्काळजीपणे व हयगयीने चालवल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सपोउपनि गोंड हे करत आहेत. मयताचे पार्थिव शवविच्छेदनासाठी वलांडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले आहे. मयताच्या पश्च्यात आई , भाऊ , पत्नी, दोन लहान मुले असा परिवार आहे. मयत अंगद सोळंखे यांना केवळ दोन एकर शेती आहे. शेजारच्या शेतात बोअर घेत असल्याने बोअर पहाण्यासाठी गेला होता. बोअरला पाणीही लागले. रात्री उशिर झाल्याने पाच जण तेथेच झोपले होते.