शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच; लातुर जिल्ह्यात वर्षभरात ६१ शेतकऱ्यांनी संपविले जीवन!
By संदीप शिंदे | Published: December 16, 2022 04:42 PM2022-12-16T16:42:05+5:302022-12-16T16:43:08+5:30
५१ कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळाली असून ५ प्रकरणे चौकशीकरिता प्रलंबित आहेत
- संदीप शिंदे
लातूर : अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान, कर्जाचा वाढलेला डोंगर, नापिकीसह विविध कारणांमुळे गेल्या वर्षभरात ६१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नाेंद शासनदरबारी आहे. यापैकी ५१ कुटुंबीयांना प्रत्येकी १ लाख रुपयांची मदत करण्यात आली असून, ५ प्रस्ताव चौकशीकरिता प्रलंबित आहेत. दरम्यान, शासनस्तरावरून शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी केवळ कागदोपत्रीच उपायोजना होत असल्याने शेतकरी आत्महत्याचे प्रमाण वाढले आहे.
जिल्ह्यात जानेवारीमध्ये ५, फेब्रुवारी ४, मार्च ८, एप्रिल ४, मे ६, जून ५, जुलै २२, ऑगस्ट ५, सप्टेंबर ९, ऑक्टोबर २, नोव्हेंबर ७ तर डिसेंबर महिन्यात २ अशा एकूण ६१ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे. दरम्यान, यामध्ये कर्जबाजारीपणा, नापिकी, अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाल्याने कर्ज कसे फेडणार, या विवंचनेतून शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत.
सरकारी उपाययोजना कागदावरच...
शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत असल्या तरी त्याची अंमलबजावणी केवळ कागदावरच होत आहे. पीककर्ज वाटप, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत, शासकीय योजनांचा थेट लाभ आदींची अंमलबजावणीही योग्यरीतीने केल्यास आत्महत्येस प्रतिबंध करता येणार आहे.
आत्महत्येची ही आहेत कारणे...
शेतमालाला जाहीर केलेला आधारभूत किंमत कधीच मिळत नाही. परिणामी, पिकावर केलेला खर्चही निघत नसल्याने शेतकरी कर्जबाजारी होत आहे. त्यामुळे मुलींचे शिक्षण, आरोग्य खर्च, लग्न, उदरनिर्वाह, बँकेचे कर्ज कसे फेडणार ? या विवंचनेतून शेतकरी आत्महत्या होत आहेत.
५ अपात्र तर ५ प्रस्ताव प्रलंबित...
वर्षभरात ६१ शेतकरी आत्महत्या समोर आल्या आहेत. यातील ५१ कुटुंबीयांना प्रत्येकी १ लाखाची मदत देण्यात आली आहे. तर ५ प्रस्ताव अपात्र ठरविण्यात आले असून, ५ प्रस्ताव चौकशीकरिता प्रलंबित आहेत. त्यावर तातडीने निर्णय घेण्याची गरज आहे.
सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक आत्महत्या...
जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे शेतशिवारात पाणी साचल्याने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कर्ज, कुटुंबाचा गाडा कसा हाकणार ? या विंवचनेतून याच महिन्यात सर्वाधिक ९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. यापैकी ८ कुटुंबीयांना मदत देण्यात आली आहे.
वर्षभरातील महिनानिहाय शेतकरी आत्महत्या...
जानेवारी - ०५
फेब्रुवारी - ०४
मार्च - ०८
एप्रिल - ०४
मे - ०६
जून - ०५
जुलै - ०४
ऑगस्ट - ०५
सप्टेंबर - ०९
ऑक्टोबर - ०२
नोव्हेंबर - ०७
डिसेंबर - ०२
एकूण ६१