देवणी तालुक्यात गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 04:50 PM2018-12-29T16:50:54+5:302018-12-29T16:51:46+5:30
दुष्काळी परिस्थिती व वाढत्या कर्जामुळे शेतकरी चिंताग्रस्त
देवणी (लातूर ) : दुष्काळी परिस्थिती व वाढत्या कर्जामुळे चिंताग्रस्त झालेल्या देवणी तालुक्यातील नागतीर्थवाडी येथील एका शेतकऱ्याने शेतातील झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली.
व्यंकट माचुरेड्डी गुणाले (६४, रा़ नागतीर्थवाडी) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे़ व्यंकट गुणाले यांना अडीच एकर शेती आहे़ त्यांच्यावर भारतीय स्टेट बँकेचे १ लाख ८० हजार रुपयांचे व अन्य एका बँकेचे २५ हजारांचे कर्ज असल्याचे नातेवाईकांनी सांगितले़ यंदा दुष्काळी परिस्थिती असल्याने ते चिंताग्रस्त झाले होते़ त्यामुळे त्यांनी शनिवारी दुपारी आत्महत्या केली़ या घटनेची माहिती मिळताच देवणी पोलिसांनी घटनास्थळास भेट देऊन पंचनामा केला़ मयत गुणाले यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.