शेतक-याने उपविभागीय कार्यालयात घेतले विष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 05:23 AM2017-12-01T05:23:08+5:302017-12-01T05:23:29+5:30
औसा तालुक्यातील उजनी येथून जाणाºया राष्ट्रीय महामार्गाच्या मावेजाप्रकरणी निर्णय विरोधात गेल्याने नारायण आप्पाराव देशमुख (४२, रा. उजनी, ता. औसा) या शेतकºयाने उपविभागीय कार्यालयात विषप्राशन केले.
लातूर : औसा तालुक्यातील उजनी येथून जाणाºया राष्ट्रीय महामार्गाच्या मावेजाप्रकरणी निर्णय विरोधात गेल्याने नारायण आप्पाराव देशमुख (४२, रा. उजनी, ता. औसा) या शेतकºयाने उपविभागीय कार्यालयात विषप्राशन केले. गुरुवारी दुपारी घडलेल्या याप्रकरणात उपस्थितांनी हस्तक्षेप करून नारायण यांना रुग्णालयात दाखल केले.
नारायण यांच्या हिश्श्याला आलेल्या ३ एकर १० गुंठे जमिनीचा वाद १९८९ पासून सुरू आहे. परंतु, जमिनीवर नारायण यांचाच कब्जा होता, असा दावा त्यांचे बंधू भाऊसाहेब देशमुख यांनी केला. या जमिनीपैकी १२ गुंठे जमीन राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित करण्यात आली. त्याचा एकूण मावेजा ४३ लाख ५६ हजार रुपये मंजूर झाला होता. तो खरेदीखत ज्यांच्या नावे आहे, त्यांना देऊ नये, न्यायालयाचा निकाल येईपर्यंत निर्णय घेऊ नये, असा अर्ज नारायण देशमुख यांनी औसा-रेणापूर उपविभागीय कार्यालयात दिला होता. त्यावर सुनावणी घेऊन उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाते यांनी कौशल्याबाई तापडिया यांच्या बाजूने २७ नोव्हेंबरला निकाल दिला. त्यानुसार संबंधितांना मावेजाची रक्कम अदा करण्यात आल्याचे उपविभागीय अधिकारी विधाते यांनी सांगितले.
पत्नीची याच वादातून आत्महत्या
जमीन वादाच्या तणावातूनच नारायण देशमुख यांच्या पत्नीनेही यापूर्वीच आत्महत्या केली आहे. वृद्ध आई, एक अपंग मुलगा व मुलीसह नारायण उजनी येथे राहतात, असे बंधू भाऊसाहेब यांनी सांगितले.